स्वित्झर्लंडमध्ये नववर्षाच्या स्वागताला गालबोट; बारला लागलेल्या भीषण आगीत ४० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

WhatsApp Group

स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या क्रॅन्स-मोंटाना येथे नववर्षाचा आनंद एका भीषण शोकांतिकेत बदलला आहे. येथील ‘ले कॉन्स्टेलेशन’ (Le Constellation) नावाच्या बारमध्ये लागलेल्या आगीत किमान ४० लोकांचा होरपळून मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने या भीषण दुर्घटनेची पुष्टी केली आहे. मृतांमध्ये अनेक देशांच्या नागरिकांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शॅम्पेनच्या बाटल्यांवरील फटाके ठरले जीवघेणे?

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग गुरुवारी पहाटे १:३० च्या सुमारास लागली. बारमध्ये सुमारे २०० लोक नववर्षाचे सेलिब्रेशन करत होते. काही वेट्रेस शॅम्पेनच्या बाटल्या घेऊन येत होत्या, ज्यावर ‘स्पार्कलर्स’ (फटाके) लावलेले होते. या बाटल्या छताच्या खूप जवळ गेल्यामुळे छताने अचानक पेट घेतला आणि काही क्षणात संपूर्ण बार आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एक वेट्रेस दुसऱ्या वेटरच्या खांद्यावर उभी राहून शॅम्पेन सर्व्ह करत होती, तेव्हाच ही ठिणगी छताला लागली.

ओळख पटवणे कठीण; मदतकार्य युद्धपातळीवर

इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, मृतादेह इतक्या वाईट रीतीने होरपळले आहेत की त्यांची ओळख पटवणे सध्या अशक्य झाले आहे. नातेवाईकांसाठी क्रॅन्स-मोंटाना येथील ‘रीजेंट कॉन्फरन्स सेंटर’मध्ये मदत केंद्र उभारण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्विस अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी धाव घेतली. सध्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून क्रॅन्स-मोंटानावर ‘नो-फ्लाय झोन’ (विमान उड्डाण बंदी) लागू करण्यात आला आहे. जिनिव्हामधील इटालियन महावाणिज्य दूत आणि राजदूत घटनास्थळी रवाना झाले आहेत.

जागतिक नेत्यांकडून शोक व्यक्त

स्विस महासंघाचे अध्यक्ष गाय पार्मेलीन यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “आनंदाच्या क्षणाचे रूपांतर एका भीषण शोकांतिकेत झाले आहे.” फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त करत स्वित्झर्लंडला पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकन दूतावासाने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना केली असून स्वित्झर्लंडमध्ये असलेल्या अमेरिकन नागरिकांना आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधून सुरक्षित असल्याची खात्री देण्याचे आवाहन केले आहे. ही आग मुद्दाम लावलेली नसून अपघाती असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.