
तरुणाईमध्ये नवचैतन्य भरण्यासाठी, त्यांच्या भविष्याला दिशा देण्यासाठी राष्ट्रीय युवा दिवसाचं विशेष महत्व आहे. आध्यात्मिक वक्ते आणि विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीला दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. अवघ्या २५ व्या वर्षी सन्यास घेत राष्ट्रकार्याला स्वामी विवेकानंदांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं.जगात सर्वात तरुण लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आज राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जात आहे. स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच १२ जानेवारीला दरवर्षी १९८४ पासून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. स्वामी विवेकानंदांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व, देशप्रेम, समाजकार्य आणि प्रेरणादायी विचारांची युवा पिढीला ओळख व्हावी, हा यामागचा उद्देश आहे.
आजच्या दिवशीच म्हणजे १२ जानेवारी १८६३ ला स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला होता. त्यांचं खरं नाव नरेंद्रनाथ दत्त असं होतं. भारतीय वेदशास्र, संगीत आणि आध्यात्माची त्यांनी विशेष आवड होती. अवघ्या २५ व्या वर्षी गुरु रामकृष्ण परमहंसांपासून प्रभावित होऊन त्यांनी सन्यास घेतला. स्वामी विवेकानंद यांनी यानंतर १८९७ ला रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यानंतर पुढच्याच वर्षी गंगा नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या बेलुरमध्ये रामकृष्ण मठ स्थापन केलं.
महिलेच्या लग्नाच्या प्रस्तावावर काय म्हणाले स्वामी विवेकानंद?
एका विदेशी महिलेने स्वामी विवेकानंदांसमोर लग्नाचा प्रस्तावर ठेवला होता. त्यावेळी आश्चर्यचकित होत विवेकानंद हे त्या महिलेला म्हणाले, मी सन्यासी असल्यानं तुमच्याशी लग्न करु शकत नाही. मात्र, तुम्हाला माझ्याशी लग्न का करायचं आहे? त्यावर ती महिला म्हणाली की तिला स्वामी विवेकानंदांसारखाच तेजस्वी पुत्र हवा आहे. त्यावर स्वामी विवेकानंद विनम्रतापुर्वक म्हणाले, ‘आजपासून मी तुमचा पुत्र आणि तुम्ही माझ्या माता आहेत’. हे ऐकताच त्या महिलेनं स्वामींची माफी मागितली. विवेकानंदांच्या मनात महिलांविषयी असलेल्या नितांत आदराचं हे मूर्तीमंत उदाहरण होतं.
शिकागोतील ऐतिहासिक भाषण…
१८९३ ला शिकागो येथे आयोजीत केलेल्या या धर्म संसदेत भारतातर्फे स्वामी विवेकानंद सहभागी झाले होते. या धर्मसंसदेतील त्यांचं भाषण त्याकाळी विशेष गाजलं. ‘अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, मला गर्व आहे की मी अशा देशाचं प्रतिनिधित्व करतो ज्या देशात जगातील देशांनी आणि धर्मांनी त्रस्त केलेल्या लोकांना शरण दिलं जातं’ असं म्हणत त्यांनी भाषणाला सुरवात केली. त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन सभागृहात २ मिनिटं टाळ्यांचा कडकडाट सुरु होता. परदेशातील मंचावर एका भारतीयाच्या या सन्मानाने देशाची मान गर्वानं उंचावली होती.
स्वामी विवेकानंदांचे काही प्रेरणादायी विचार
• स्वत:ला कमजोर समजणं सर्वात मोठं पाप आहे.
• ज्या दिवशी आपल्यासमोर कुठली समस्या आली नाही तेव्हा समजावं आपण चुकीच्या रस्ताने जात आहोत.
• अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.
• महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.