रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पदार्पणात २०० धावा करणारा सुवेद पारकर ठरला मुंबईचा दुसरा फलंदाज

WhatsApp Group

रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीत मुंबई संघाचा क्रिकेटपटू सुवेद पारकर याने पदार्पण सामना खेळला आणि यामध्ये विक्रमी खेळी केली. पारकरने उत्तराखंडविरुद्ध दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात द्विशतक झळकावले. पदार्पणाच्या प्रथम श्रेणी सामन्यात द्विशतक झळकावणारा तो १२वा फलंदाज ठरला आहे.

सुवेदला अंतिम प्लेइंग-११ मध्ये संधी देण्यात आली आणि त्याने मिळालेल्या संधीच सोनं केलं. त्याने पहिल्याच दिवशी शानदार शतकी खेळी केली. सुवेद पारकर दिवसअखेरीस १०४ धावांवर नाबाद राहिला होता. पहिल्यादिवशी सुवेदने २१८ चेंडूंचा सामना केला व आठ चौकार आणि दोन षटकार लगावले. सुवेद पारकरला साथ दिली ते सर्फराजन खानने. सर्फराज काल ६९  धावांवर नाबाद होता. आज त्याने शानदार शतक झळकावलं.

सुवेद पारकरचा हा फर्स्ट क्लासचा पहिला सामना होता. कर्नल सी.के.नायडू ट्रॉफीमध्ये सुवेदने दमदार फलंदाजी केली होती. त्याने ६ सामन्यांमध्ये ६०१ धावा केल्या. ६६.७८ च्या सरासरीने त्याने धावा केल्या होत्या. सामन्याआधी मुंबईची मधलीफळी खूपच कमकुवत वाटत होती, कारण संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे बाहेर आहे. अजिंक्य रहाणेच्या अनुपस्थितीत मुंबईने सुवेद पारकरला संधी दिली आणि त्याने संधीचा पूर्ण फायदा घेतला.