मोठी बातमी! सत्यजित तांबे यांचं निलंबन, नाना पाटोले यांची माहिती

WhatsApp Group

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या सत्यजीत तांबे यांना अखेर काँग्रेसने निलंबित केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली. आज पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीने पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आपली बाजू मांडली. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते नाना पटोले, यूबीटी गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते.

यापूर्वी, काँग्रेसने रविवारी सत्यजित तांबे यांचे वडील आणि तीन वेळा आमदार असलेले सुधीर तांबे यांना निलंबित केले, कारण त्यांनी पक्षाने उमेदवारी देऊनही निवडणुकीसाठी अर्ज भरला नाही आणि त्याऐवजी त्यांच्या मुलाला अपक्ष म्हणून उभे केले. आता या निवडणुकीत काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसल्याने मविआने आता या निवडणुकीत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. याशिवाय अमरावती पदवीधर मतदारसंघातून धीरज लिंगाडे, नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबळे, कोकण शिक्षक मतदारसंघातून बलराम पाटील, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून विक्रम काळे यांना एमव्हीएने पाठिंबा जाहीर केला आहे.

आज पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांना निलंबित करत असल्याचे सांगितले होते. पटोले म्हणाले की, तांबे यांच्या कुटुंबीयांचे काय झाले यावर आम्हाला भाष्य करायचे नाही. सध्या सत्यजित तांबे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने आता अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे नाशिक आणि अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी, तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकणात शिक्षकांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार असून 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.