भारताला मोठा धक्का, हा खेळाडू संपूर्ण कसोटी मालिकेतून पडला बाहेर!

WhatsApp Group

कानपूर – न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. केएल राहुलच्या जागी आता सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुलच्या डाव्या मांडीच्या स्नायूमध्ये ताण आल्यामुळे त्यामुळे तो संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. केएल राहुलच्या जागी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.


राहुलने भारतासाठी ४० कसोटी सामने खेळले आहेत. आतापर्यंत त्याने 35.16 च्या सरासरीने 2321 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 199 धावा आहे, जी त्याने 2016 मध्ये चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध केली होती.

सूर्यकुमार यादवसाठी हे वर्ष खूप चांगले गेले असून, 2021 मध्ये त्याने T20 आणि वनडेत पदार्पण केले. आणि आता वर्षाच्या अखेरीस त्याला कसोटी संघात स्थान मिळाले आहे. मात्र, कानपूरच्या प्लेईंग-11मध्ये त्याला स्थान मिळेल की नाही, यासाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोणाला मिळणार संधी?
टीमच्या सराव सत्रादरम्यान शुभमन गिल मयंक अग्रवालसोबत फलंदाजी करताना दिसला. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा उपकर्णधार चेतेश्वर पुजारानेही नेटमध्ये फलंदाजी केली. श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. पूर्वीच्या सांघिक रणनीतीनुसार शुभमनने मधल्या फळीत फलंदाजी करणे अपेक्षित होते. मात्र राहुलच्या अनुपस्थितीत हा युवा सलामीवीर आता त्याच्या पसंतीच्या स्थानावर फलंदाजी करेल.

भारत आणि न्यूझीलंडमध्ये एकूण दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत, पहिला सामना 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होईल तर दुसरा सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत सुरू होईल. पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करेल, मात्र दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पुनरागमन करताना दिसेल.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अगरग्रवाल, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा.