Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवने रचला इतिहास, केली ‘ही’ मोठी कामगिरी

WhatsApp Group

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना माऊंट मौनगानुई येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य दिले होते. यादरम्यान टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने सूर्यकुमार यादवने झंझावाती कामगिरी करत शतक झळकावून इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये एकाच वर्षी दोन शतके करणारा तो दुसरा भारतीय ठरला. 2018 च्या सुरुवातीला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने हे केले होते. सूर्यकुमार टी-20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. 2022च्या टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तो तिसरा खेळाडू होता. टी-20 क्रमवारीत तो अव्वल फलंदाज आहे.

विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवची दोन्ही शतके परदेशात झाली आहेत. यापूर्वी त्याने जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध शतक झळकावले होते. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर सूर्यकुमार फलंदाजीला आला. त्याने 32 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 51 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 111 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 217.65 होता.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर ऋषभ पंत अवघ्या 6 धावा करून बाद झाला. यानंतर ईशान किशनने सूर्यकुमार यादवसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यानंतर ईशान 31 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. त्याने 5 चौकार आणि 1 षटकार मारला. यानंतर श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. पण त्यांनाही विशेष काही करता आले नाही. अय्यर 13 धावा करून बाद झाला. त्याने 9 चेंडूंचा सामना करताना एक चौकार आणि एक षटकार ठोकला.

हार्दिक पंड्या 13 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. तर दीपक हुडाला खातेही उघडता आले नाही. पहिल्याच चेंडूवर तो झेलबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. वॉशिंग्टन सुंदरही पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. त्यांना खातेही उघडता आले नाही. सूर्यकुमार शेवटपर्यंत राहिला. त्याने 51 चेंडूंचा सामना करत नाबाद 111 धावा केल्या. सूर्याने या खेळीत 7 षटकार आणि 11 चौकार लगावले. अशा प्रकारे टीम इंडियाने 20 षटकांत 6 विकेट गमावून 191 धावा केल्या.