ICC T20 Rankings: सूर्यकुमार यादवने T20 क्रमवारीत घेतली मोठी झेप, बाबर आझमची नंबर वनची खुर्ची धोक्यात

WhatsApp Group

ICC T20 Rankings: सूर्यकुमार यादवने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20 मध्ये शानदार फलंदाजी केल्यानंतर T20 क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. सूर्यकुमार आता T20 क्रमवारीत बाबर आझमपेक्षा एक स्थान मागे आहे. वेस्ट इंडीज विरुद्ध (IND vs WI) 44 चेंडूत 76 धावांची खेळी केल्यानंतर तो आता पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमपेक्षा ICC T20 क्रमवारीत फक्त दोन गुणांनी मागे आहे.

आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत सुर्याने तीन स्थानांनी झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे. त्याचे आता 816 रेटिंग गुण आहेत, तर बाबर आझमचे 818 गुण आहेत. या यादीत पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान तिसऱ्या स्थानावर आहे, त्याचे 794 गुण आहेत. टॉप 10मध्ये सूर्यकुमार हा एकमेव भारतीय आहे.

यादवने गेल्या वर्षीच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि गेल्या महिन्यात नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध शतक आणि मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावलेल्या अर्धशतकानंतर तो आता T20 क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

या यादीत इशान किशन 14 व्या क्रमांकावर तर कर्णधार रोहित शर्मा 16 व्या क्रमांकावर कायम आहे. लोकेश राहुलचाही टॉप-20 फलंदाजांमध्ये समावेश आहे, जो 20 व्या स्थानावर कायम आहे. श्रेयस अय्यरला एक स्थान गमवावे लागले असून तो 24 व्या स्थानावरून 25व्या स्थानावर घसरला आहे. विराट कोहलीही एका स्थानाच्या नुकसानासह 28 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवने अलिकडच्या काळात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जोरदार फलंदाजी केली आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या क्रमवारीवरही दिसून आला आहे. या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांनंतर सूर्यकुमार यादव बाबर आझमलाही मागे टाकू शकतो.