सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवल्यानंतर खेड्यापाड्यांमध्ये लवकरच शंकरपट रंगणार आहे. ही स्पर्धा भरवताना कोर्टानं घालून दिलेल्या नियमावलीचं बैलगाडा शर्यत मालकांना पालन करणं अनिवार्य आहे. शर्यतींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणंही कोर्टानं बंधनकारक केलं आहे.
न्यायालयानं राज्यातील बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवल्यानंतर लवकरच गावागावात सर्जा-राजाच्या शर्यतींचा धुरळा पाहायला मिळणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २०१७ ला एक मोठा निर्णय घेत बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं आता ही बंदी उठवून काही अटीसंह बैलगाडा शर्यतींसाठी परवानगी दिली आहे. बैल या प्राण्याचा संरक्षण यादीत समावेश असल्यानं बैलगाडा शर्यतींवर राज्यात बंदी घालण्यात आली होती.
शर्यतीत बैलांचा अमानूष छळ होतो, त्यांना चाबकानं, काठीनं मारहाण करण्यात येते, विजेचे शॉक देण्यासह क्रृर पद्धतीनं त्यांच्यावर अत्याचार करण्यात येत असल्याचं सांगत या शर्यतींना प्राणीमित्रांचा विरोध होता. बैलाचं पोट मोठं असल्यानं तो धावू शकणारा प्राणी नसल्याचा युक्तीवाद पेटा या संस्थेनं न्यायालयात केला. तर राज्य सरकारच्या वतीनं ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. बैलाच्या धावण्याच्या क्षमतेबाबत स्थापन सत्यशोधन समितीच्या अहवालाद्वारे त्यांनी काही मुद्दे मांडले.
राज्यातील ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचं आकर्षण मोठं आहे. ग्रामीण भारताच्या संस्कृतीशी आणि अर्थकारणाशी या शर्यतींचा थेट संबंध आहे. जेव्हा या स्पर्धा भरतात तेव्हा गावाला जत्रेचं स्वरुप प्राप्त होतं. भेळवाल्यापासून वाजंत्र्यांपर्यंत सर्वांना रोजगार प्राप्त होतो. या शर्यतींसाठी ‘खिलार’ जातीच्या बैलाचं संगोपन केलं जातं. योग्य आहार आणि प्रशिक्षणानंतरच या बैलांना शर्यतीत उतरवलं जातं. पश्चिम महाराष्ट्रातील मुख्यत: दुष्काळी भागात या बैलांची संख्या मोठी आहे.
महाराष्ट्रात या शर्यतीला ‘शंकरपट’ म्हणूनही ओळखलं जातं. पंजाबमध्ये ‘बौलदा दी दौड’, कर्नाटकात ‘कंबाला’, तामिळनाडूत ‘रेकला’ नावानं ही शर्यत सर्वपरिचित आहे. बैलांशी निगडीत तामिळनाडूतील ‘जलिक्ट्टू’ आणि स्पेनमधील ‘बुलफाईट’ हे खेळ विशेष प्रसिद्ध आहे. या दोन्ही स्पर्धांचं स्वरुप बैलगाडा शर्यतींपेक्षा खूप वेगळं आहे. स्पेनमधील बुलफाईटला तर देशविदेशातील पर्यटक दरवर्षी हजेरी लावत असतात. याच धर्तीवर राज्यातील बैलगाडा शर्यतींचं आधुनिकीकरण झाल्यास राज्यातील परदेशी पर्यटनाला वाव मिळू शकेल.
वर्षभर शेतात बळीराज्यासोबत राबराब कष्ट करणाऱ्या बैलांची पूजा करण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. पोळा सणाच्या निमित्ताने या प्राण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. अशा या आपल्या ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या बैलांचा शर्यतींदरम्यान कुठल्याही प्रकारे छळ होणार नाही, याची काळजी शर्यत आयोजनाचा भाग असलेल्या सर्वांनी घ्यायला हवी. नियमांच्या अधीन राहुन पुन्हा एकदा गावाखेड्यात सर्जा-राजा सुसाट धावतील…भिर्रर्र… आवाजानं आसमंत दणाणून निघेल…शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पुन्हा स्थिरावेल…