एखाद्या सुपरस्टारचं स्टारडम नेमकं काय असतं हे राजेश खन्नांच्या रुपात बॉलिवूडने पहिल्यांदाच अनुभवलं होतं. मुंबई विद्यापीठाच्या पुस्तकांमध्ये ‘द करिश्मा ऑफ राजेश खन्ना’ या नावानं त्याकाळी निबंध होता. चमकदार बॉलिवूड करिअरनंतर राजेश खन्नांनी राजकारणातही आपलं नशीब आजमावलं होतं.हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज ७९ वी जयंती. आपल्या अष्टपैलू शैलीनं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे राजेश खन्ना आज जरी आपल्यात नसले, तरी त्यांच्या अभिनयानं ते आपल्या आठवणीत जिवंत आहेत.
आराधना, कटी पतंग, अमर प्रेम, प्रेम नगर, नमक हराम, खामोशी, दो रास्ते सारख्या अनेक सिनेमांमधून त्यांनी दमदार अभिनय केला. ‘आनंद’ हा त्यांचा चित्रपट त्याकाळी विशेष गाजला. १६३ फिचर फिल्म आणि १७ शॉर्ट फिल्म्स अशा एकुण १८० चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. २९ डिसेंबर १९४२ मध्ये अमृतसरमध्ये जन्मलेल्या राजेश खन्नांचं मुळ नाव जतिन खन्ना असं होतं. फक्त अभिनयच नाही तर त्यांच्या हटके अंदाजाची लाखो चाहत्यांवर भुरळ होती. त्यांच्या आयुष्यातले काही किस्से आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनामध्ये शाबूत आहेत.
लाघवी हास्य, मान झुकवण्याची लकब आणि डोळ्यांच्या अदाकारीने त्याकाळी अनेक तरुणी घायाळ व्हायच्या. गोल्डन डेज मधल्या या सुपर रोमॅन्टिक हिरोला तरुणी चक्क रक्ताने लव्ह लेटर लिहायच्या. काहींनी तर त्यांच्या फोटोसोबतच लग्न लावून घेतलं होतं. राजेश खन्नांच्या नावाचं गोंदण त्याकाळी अनेकींच्या हातावर दिसायचं. तरुणींच्या गळ्यातल्या ताईत असलेल्या राजेश खन्नांची लव्ह लाईफही खूप भन्नाट होती. डिंपल कपाडियांशी लग्न होण्यापूर्वी राजेश खन्ना अभिनेत्री अंजू महेंद्रूसोबत रिलेशनशिपमध्ये होते. ब्रेकअपनंतर जाणूनबुजून राजेश यांनी त्यांच्या लग्नाची वरात अंजू यांच्या बंगल्यासमोरून वाचतगाजत नेली. हा बंगला अंजू यांना राजेश खन्नांनीच भेट दिला होता.
बॉलिवूडमध्ये ‘काका’ या नावानंही राजेश खन्ना प्रसिद्ध होते. पंजाबी भाषेत लहान मुलाला काका असं म्हणतात. अत्यंत कमी वयात चित्रपटात पदार्पण केल्यामुळे सेटवर अनेक जण राजेश खन्नांना काका म्हणून हाक मारायचे. पुढे हेच नाव त्यांच्या फॅन्समध्येही लोकप्रिय झालं. १९६६ साली ‘आखरी खत’ या चित्रपटातून राजेश खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सलग १७ सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या सुपरस्टारनं करिअरमध्ये पडता काळही अनुभवला. यश-अपयशाची चवही चाखली. राजेश खन्नां यांच्यावरील जीवनपट मोठ्या पडद्यावर येणार आहे. गौतम चिंतामणींच्या ‘द लोनलीनेस ऑफ बीइंग राजेश खन्ना: डार्क स्टार’ या पुस्तकावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निखिल द्विवेदी निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन फराह खान करणार आहे. या चित्रपटात राजेश खन्नांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.