सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; रोहित पवारांची पोस्ट ठरली चर्चेचा विषय

WhatsApp Group

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नवा टप्पा नोंदवला गेला आहे. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर राजभवन येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी त्यांच्या नियुक्तीमुळे भरून निघाल्याचे चित्र दिसत असले तरी, आता त्यांच्या वाट्याला कोणती मंत्रीपदे येणार याकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “खरं तर अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मात्र सुनेत्राकाकींच्या रूपात तरी आम्हाला तिथे अजितदादांचीच छबी दिसते.”

आपल्या भावना व्यक्त करताना रोहित पवार पुढे म्हणतात, “डोक्यावर डोंगराएवढं दुःख असताना आणि संपूर्ण कुटुंब शोकसागरात असताना शुभेच्छा द्याव्यात तरी कशा, हेच कळेनासं झालं आहे.” त्यांच्या या शब्दांमधून अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाची तीव्रता स्पष्टपणे जाणवते.