शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा 500 रुपये विद्यावेतन

WhatsApp Group

मुंबई: राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअरविषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार आहे, त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन (स्टायफंड) देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.

कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हे आणि 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट येथे आयोजित शिबिराचे उद्घाटन करून या राज्यस्तरीय उपक्रमाचा मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, डॉन बॉस्को संस्थेचे संचालक फादर अँथनी पिंटो, माजी नगरसेवक हरीश भांदिर्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

सुमारे 3 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले. शिबिराच्या ठिकाणी विविध करिअर विषयक संधी, रोजगार-स्वयंरोजगार विषयक शासकीय योजना, देशातील आणि परदेशातील विविध शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक कर्जविषयक योजना आदींची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सना विद्यार्थ्यांसह पालकांनीही भेट देऊन माहिती घेतली. याठिकाणी विद्यार्थ्यांसह पालकांचेही करिअरविषयक समुपदेशन करण्यात येत होते. यासोबतच दिवसभर शिक्षण आणि करिअरविषयक क्षेत्रातील तज्ज्ञानी विविध विषयांवर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, देशात मागील काही वर्षात औद्योगिक, कॉर्पोरेट अशा विविध क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. त्या बदलांना अनुसरून विविध कौशल्ये असलेले रोजगार या क्षेत्रामध्ये व्यापक प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. पण या कौशल्याचे प्रशिक्षण कोठे घ्यायचे, त्यासाठीच्या प्रशिक्षण संस्था कुठे आहेत, प्रवेशप्रक्रिया कशी असते याची माहिती ज्ञान अनेकांना नसते. त्यामुळे अनेक युवक-युवती पारंपरिक शिक्षण, प्रशिक्षणच घेताना दिसतात. या युवकांसाठी भविष्याची विविध नवीन क्षितिजे खुली व्हावीत, नवनवे अभ्यासक्रम, स्किल्स त्यांना माहीत व्हावेत यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात दि. 6 मे ते 6 जून 2023 पर्यंत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या करिअरविषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून दिली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअरविषयक समुपदेशन केले जाणार आहे. राज्यातील ग्रामीण, शहरी अशा सर्व भागातील विद्यार्थी, युवक-युवती व पालकांनी या शिबिरांमध्ये सहभागी व्हावे आणि बदलत्या काळास अनुसरुन ठिकठिकाणी सुरु झालेल्या विविध शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी अभ्यासक्रमांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्किलिंग, अपस्किलिंग गरजेचे – प्रधान सचिव मनिषा वर्मा

कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, आपले ज्ञान, कौशल्य सतत अद्ययावत ठेवणे ही आता काळाची गरज बनली आहे. बदलत्या तंत्रज्ञानास अनुसरून सतत अद्ययावत ज्ञान मिळविणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच कौशल्य विकास विभाग आता स्किलिंग, अपस्किलिंगवर भर देत आहे. कौशल्य विकास विभागामार्फत आयोजित या करिअर शिबिरांमधून राज्यातील विद्यार्थ्यांना करिअर करण्याची नवनवीन क्षितिजे खुली होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना  आदरांजली वाहण्यात आली. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी यांनी प्रास्ताविक केले, तर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या नवनवीन अभ्यासक्रमांविषयी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर यांनी माहिती दिली.