
मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिका प्लास्टिक बंदीबाबत कडक कारवाई करत आहे. ठिकठिकाणी छापे टाकून दुकानदार, हॉटेल्स आणि प्लास्टिक वापरून त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई तीव्र करण्यात आली आहे. गेल्या 20 दिवसांत ठिकठिकाणी कारवाई करत महापालिकेने 356 किलो प्लास्टिक जप्त करून सुमारे 4.30 लाख रुपये दंड वसूल केला आहे. प्लास्टिक बंदी प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही महापालिकेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबईला सुंदर बनवण्यासाठी महापालिकेकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. याअंतर्गत मुंबईत 50 मायक्रॉनपेक्षा पातळ प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाबरोबरच मुंबईतील पुरालाही ते कारणीभूत आहे. 26 जुलै 2005 रोजी आलेल्या पुराचे मुख्य कारण प्लास्टिक मानले गेले.
या पुरासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांनीही एकप्रकारे या प्लास्टिकला जबाबदार धरले होते, त्यानंतर जून 2018 मध्ये महापालिकेने 50 मायक्रॉनपेक्षा पातळ प्लास्टिकच्या विक्री, उत्पादन आणि वापरावर बंदी घातली होती. त्याचे उत्पादन, विक्रेते आणि त्याचा वापर करणाऱ्यांवर महापालिका मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहे.
महापालिकेने १ जुलैपासून प्लास्टिक बंदीच्या कारवाईची मोहीम सुरू केली आहे. मार्केटमधील दुकानात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
प्लास्टिकचे कप, प्लेट्स, ग्लास, चमचे आदींवर बंदी घालण्यात आली आहे. हॉटेल्समध्ये पॅकेजिंगसाठी प्लास्टिकचा वापर, पिण्यासाठी प्लास्टिकचे ग्लास इत्यादींवर बंदी आहे. महापालिकेने आतापर्यंत 22 हजार 325 ठिकाणी धाडी टाकल्या असून 580 ठिकाणी कारवाई केली आहे. 29 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.