VIDEO: अजब चोरी! हरवलेल्या स्कूटीचे आले ट्रॅफिक चलन अन् चोराचा चेहराच समोर आला; फोटो पाहून मालक म्हणाला – “आता तरी पकडा!”

WhatsApp Group

Stolen scooty tracked through traffic challa

हैदराबाद: एखाद्याची गाडी चोरीला गेली की ती परत मिळण्याची आशा कमीच असते. मात्र, हैदराबादमध्ये एक असे प्रकरण समोर आले आहे, जे पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. तीन महिन्यांपूर्वी चोरीला गेलेल्या स्कूटीचा सुगावा खुद्द चोरानेच पोलिसांच्या कॅमेऱ्यासमोर येऊन दिला आहे. चोरीच्या स्कूटीवर फिरणाऱ्या या पठ्ठ्याने ट्रॅफिकचे नियम तोडले आणि चक्क चोराच्या फोटोसह ट्रॅफिक चलन मालकाच्या मोबाईलवर धडकले. आता या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

नेमकी घटना काय?

हैदराबादमधील फैजल रहमान नावाच्या व्यक्तीची स्कूटी सुमारे तीन महिन्यांपूर्वी चोरीला गेली होती. त्यांनी हबीब नगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार आणि FIR देखील दाखल केली होती. मात्र, अनेक दिवस उलटूनही स्कूटीचा शोध लागला नाही. अचानक एक दिवस फैजल यांच्या मोबाईलवर ट्रॅफिक चलनाची नोटीस आली. जेव्हा त्यांनी चलनाची लिंक उघडून पाहिली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. चलनासोबत असलेल्या फोटोमध्ये त्यांचीच चोरी झालेली स्कूटी एक व्यक्ती चालवताना स्पष्ट दिसत होती.

“आता तर पुरावा मिळालाय, पकडा त्याला!”

स्कूटी चालवणाऱ्या व्यक्तीचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत असल्याने फैजल यांनी तातडीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी हैदराबाद ट्रॅफिक पोलीस आणि शहर पोलिसांना टॅग करत आवाहन केले की, “आता तर चोराचा चेहरा आणि स्कूटी दोन्ही समोर आहेत, आता तरी त्याला पकडा आणि माझी गाडी परत मिळवून द्या.” ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सावधान! तोच चोर असेल असं नाही

या प्रकरणात एक कायदेशीर पेचही असू शकतो. फोटोत दिसणारी व्यक्तीच चोर असेल असे ठामपणे सांगता येत नाही. अनेकदा चोरटे चोरीची गाडी स्वस्त दरात किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्याला विकून टाकतात. अशा वेळी ती गाडी विकत घेणारा निष्पाप व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकू शकतो. दिल्ली, हैदराबादसारख्या मोठ्या शहरांत असे टोळी सक्रिय असून ते चोरीच्या गाड्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकतात. सध्या पोलीस या फोटोच्या आधारे पुढील तपास करत आहेत.