‘फिनीक्स’ स्टीव्ह स्मिथच्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण!

WhatsApp Group

ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात महत्वाचे पद कोणते असेल तर ते देशाच्या पंतप्रधानांचे आणि त्या खालोखाल ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधाराचे, अशी मान्यता आहे. अनेकदा तर वर्तणुकीबाबतीत क्रिकेट कर्णधाराकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जातात. म्हणूनच जेव्हा २०१८ मध्ये ‘सॅण्डपेपर गेट’ समोर आले तेव्हा क्रिकेट बोर्डाने टोकाचा निर्णय घेत त्यांच्या कर्णधार स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी करत त्यावर एक वर्षाची बंदी घातली. मात्र आपल्या वर्तणुकीतून आणि खेळातून चमक दाखवत स्मिथने आपले कप्तानपद पुन्हा पटकावले.

मार्च २०१८ मध्ये २८ वर्षीय स्मिथ फलंदाजीच्या सर्वोच्च शिखरावर होता. नुकताच त्याने ६,००० कसोटी धावांचा पल्ला पार केला होता आणि त्याची सरासरी ६० च्या वर होती. कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक बनण्याच्या मार्गावर वाटचाल करत असताना बॉल टेम्परिंगचा स्पीड ब्रेकर स्मिथ समोर आला. या प्रकरणात कर्णधार म्हणून त्यावर ठपका आला. त्याला फक्त पायउतार करण्यात आले नाही तर त्याचे क्रिकेट सुद्धा थांबवले गेले.

त्याच वर्षीच्या एका पत्रकार परिषदेत स्मिथ हमसून हमसून रडला. अगदी झोपतानासुद्धा आपली बॅट जवळ ठेवणाऱ्या स्मिथला एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिच्या पासून दूर रहावे लागले. मात्र या दुष्कीर्तीच्या गर्तेतून स्मिथने तितकीच उंच भरारी मारली. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे पुनरागमन झाले ते २०१९ ऍशेसमध्ये. एजबॅस्टनयेथील पहिल्याच कसोटीमध्ये त्याने दोन शतके झळकावली. त्यातील त्याची १४४ धावांची खेळी तर अजरामर मानली जाईल. या मालिकेत त्याने पुढे धावांचा रतीब घातला.

२०१८ मध्ये स्मिथनंतर यष्टीरक्षक टीम पेनने कसोटी संघाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र एका प्रकरणामुळे मिळालेले कर्णधारपद दुसऱ्या प्रकरणामुळे पेनच्या हातातून निसटले. यावेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने एक अनोखा मार्ग निवडला. त्यांनी कर्णधारपदाची माळ पॅट कमिन्सच्या गळ्यात घातली. १९५६ नंतर पहिल्यांदा कमिन्सच्या रूपात एक वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार बनला.

कर्णधारपदी नियुक्त झाल्यानंतर कमिन्सने स्वतः स्टीव्ह स्मिथ आपला उपकर्णधार असावा अशी शिफारस केली. हे उघड होते की वेगवान गोलंदाजाला कधी ना कधी दुखापतीमुळे बाहेर बसावे लागणार आणि अशावेळी स्मिथ पुन्हा ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार बनेल. आणि याला ऑस्ट्रेलियन क्रिकेटने सुद्धा विरोध केला नाही. ह्याला कारण केवळ स्मिथच्या मैदानावरच्या धावा नसून त्याची मैदानाबाहेरील वागणूक सुद्धा होती.

२०१८ मध्ये स्मिथला सुनावलेल्या शिक्षेचे तीन भाग होते.

  • १ – एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर राहणे.
  • २ – दोन वर्ष कर्णधारपद न भूषविता येणे.
  • ३ – १०० तासांची समाज सेवा करणे.

क्रिकेटपासून दूर असलेल्या काळामध्ये स्मिथने गॉटचा फॉर लाईफ (Gotcha4Life) ह्या आत्महत्या रोखणाऱ्या संस्थेबरोबर शंभर तासांचे काम केले. त्याला एखाद्या क्रिकेट क्लब बरोबर काम करून सुद्धा ही शिक्षा पूर्ण करता आली असती, मात्र तसे न करता स्मिथने कठीण मार्ग अवलंबला. त्याला उपकर्णधार बनवण्याच्या आधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या सर्व बाबींची पडताळणी केली आणि नंतरच त्याला हे पद देण्यात आले.

आता कमिन्सच्या अनुपस्थितीत स्मिथ पुन्हा ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद भूषवत आहे. कदाचित हे काम त्याला फक्त एका कसोटीसाठी करावे लागेल मात्र तरीही त्याच्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुलींचं लग्नाचं वय २१ झाल्यास फायदा की तोटा?

अमरनाथ यांची ‘अमर’कथा: गोष्ट भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाची!

अशा जन्मल्या ‘अ‍ॅशेस’