क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते मुंबईत फिट इंडिया क्विझ 2022 च्या राज्य फेरीतील विजेत्यांचा सत्कार

WhatsApp Group

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज (23 जुलै 2023) मुंबईत फिट इंडिया क्विझ 2022 च्या राज्य फेरीतील विजेत्यांचा सत्कार केला. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने विजेत्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. या विजेत्यांना केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील 72 शालेय विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. फिट इंडिया क्विझ अंतर्गत शाळा आणि विद्यार्थ्यांना एकूण 3.25 कोटी रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि खेळांमध्ये सक्रिय सहभागास प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. आपल्या दैनंदिन जीवनात खेळ आणि तंदुरुस्तीचे महत्त्व सांगून त्यांनी खेळ आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय योग्य संरचना असलेल्या परिसंस्थेची गरज अधोरेखित केली. केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी पालक, मुले आणि विशेषत: युवा वर्गाने क्रीडासंस्कृतीचा अंगिकार करण्यासाठी सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याचे आवाहन केले.

क्रीडा आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या दृढ वचनबद्धतेला अधोरेखित करत अनुराग सिंह ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खेळाचे महत्त्व प्रोत्साहनापासून ते निधीपर्यंत सर्वच बाबींमध्ये उंचावले आहे यावर भर दिला. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकसह विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये असामान्य कामगिरीचे दर्शन घडवत देशाचा अभिमान वाढवला आहे. आगामी आशियाई खेळांमध्ये देशाच्या खेळाडूंनी जास्तीत जास्त पदके जिंकावीत, अनेक विक्रम मोडीत काढावेत आणि देशाचा सन्मान मिळवून द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तरुण पिढीतील आरोग्याच्या वाढत्या समस्यांवर अधोरेखित करताना, त्यांनी तंदुरुस्तीच्या व्यायामांसाठी दररोज काही वेळ देण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आणि ते सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी योगाभ्यासाचे फायदे सांगून देशातील तरुणांना फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा भाग म्हणून आयोजित केलेल्या फिट इंडिया क्विझचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारताच्या समृद्ध क्रीडा इतिहास, तंदुरुस्ती आणि पोषण याविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे. भारतातील 702 जिल्ह्यांतील 16,702 शाळांमधील 61,981 विद्यार्थ्यांनी या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीला मोठा प्रतिसाद दिला. अंदमान आणि निकोबार, कारगिल, लक्षदीप, अरुणाचल प्रदेश आणि इतर अनेक भागांसह देशाच्या विविध भागातून विद्यार्थी यात सहभागी झाले होते. लक्षणीय बाब म्हणजे, दुसऱ्या आवृत्तीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत उल्लेखनीय 70% वाढ झाली आहे, ज्यामुळे युवकांमध्ये खेळ आणि फिटनेसबद्दलची वाढती आवड आणि उत्साह दिसून येतो. दुसऱ्या आवृत्तीतही विद्यार्थिनींचा लक्षणीय सहभाग होता, कारण  सर्व स्पर्धकांमध्ये त्यांचे प्रमाण 39% इतके होते.

या फेरीतील विजेते आता स्टार स्पोर्ट्स आणि डिस्ने हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या फिट इंडिया क्विझच्या राष्ट्रीय फेरीत भाग घेतील. प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील विजेत्या शाळेला पारितोषिकाची रक्कम एकूण 2.5 लाख रुपये, तर शाळेतील 2 विद्यार्थ्यांच्या संघाला एकूण 25,000 रुपये देण्यात आले. राज्यातील प्रथम उपविजेत्या शाळेला 1 लाख रुपये आणि विद्यार्थ्यांना एकूण 10,000 रुपयांचे पारितोषिक मिळाले. तसेच द्वितीय उपविजेत्या शाळेला 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सहभागी विद्यार्थ्यांना एकूण 5 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले.

महाराष्ट्रामध्ये या प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले होते आणि स्पर्धेच्या पाच फेऱ्या झाल्या. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याणची बी. के. बिर्ला पब्लिक स्कूल ही शाळा आणि त्यांचे अभिनव भोसेकर आणि अक्षय बियाणी हे विद्यार्थी विजेते ठरले.

फिट इंडिया क्विझ हा फिट इंडिया चळवळीचा एक भाग असून याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये केली होती. भारताला एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनवणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. फिट इंडिया क्विझ 2022 ही शाळा आणि शालेय विद्यार्थ्यांना 3.25 कोटी रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करणारी क्रीडा आणि तंदुरुस्तीशी संबंधित भारतातील सर्वात मोठी प्रश्नमंजुषा आहे.

गेल्या वर्षी 29 ऑगस्ट रोजी, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी शाळांसाठी फिट इंडिया नॅशनल फिटनेस अँड स्पोर्ट्स क्विझच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली होती, त्यावेळी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, युवा व्यवहार, क्रीडा आणि गृह मंत्रालय राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक उपस्थित होते. या प्रश्नमंजुषेत भारताचा समृद्ध क्रीडा इतिहास, तंदुरुस्ती आणि पोषण यांच्याशी संबंधित विविध विषयांचा समावेश आहे.