क्रीडा विश्वावर शोककळा; तुर्कीच्या भूकंपामध्ये स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

WhatsApp Group

तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे. या घटनेत 45 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक अद्याप बेपत्ता आहेत. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. सुरक्षा कर्मचारी आता विखुरलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात गुंतले आहेत. या भूकंपामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या घटनेमुळे क्रीडा जगताचे मोठे नुकसान झाले आहे.

या विनाशकारी भूकंपात घानाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियन अत्सू याचे निधन झाले आहे. भूकंपानंतर तो बेपत्ता होता. त्याच्या शोधात शोधमोहीम राबविण्यात येत होती. ख्रिस्तियन अत्सूच्या तुर्की एजंट आणि क्लबने शनिवारी (18 फेब्रुवारी) त्याच्या मृत्यूची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, तो दक्षिण तुर्कस्तानच्या हाते प्रांतात राहत होता. त्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घराच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला आढळून आला.

ख्रिस्तियन अत्सू गेल्या वर्षीच तुर्कीच्या हॅट्सपोर क्लबमध्ये सामील झाला होता. उझुनमेहमेट यांनी हाते येथे पत्रकारांना सांगितले, “अत्सूचा मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडला आहे. अजून काही वस्तू शोधल्या जात आहेत. त्याचा फोनही सापडला आहे.” घानायन फुटबॉलपटूचे एजंट, नाना सेचेरे यांनी ट्विट केले: “मी दुःखाने सर्व हितचिंतकांना सांगू इच्छितो की अत्सूचा मृतदेह आज सकाळी सापडला आहे. त्याच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहे.”

तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी जागतिक संस्थांना मदतीची विनंती करण्यात आली आहे. त्यानंतर वाढत्या मानवतावादी संकटावर मात करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने $1 बिलियनचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पीडितांच्या मदतीसाठी निधीची मागणी केली आहे. त्याच वेळी, संयुक्त राष्ट्र पुढील तीन महिन्यांसाठी 5.2 दशलक्ष लोकांना अन्न सुरक्षा, शिक्षण, पाणी आणि निवारा यासह मदत करेल.