परभणी – गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा मात्र निघालेला नाही. विलीनकरणाची कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार नसल्याचे लक्षात येताच आणखी एका कर्मचाऱ्याने आपले जीवन संपवले आहे. परभणीच्या जिंतूर येथील आगारामध्ये चालक म्हणून काम करणाऱ्या मुजफ्फर खान यांनी विहीरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
लागोपाठ सुरु असलेला संप, उत्पन्नाचा स्त्रोत कमी झाल्यामुळे कर्जबाजारीपणा आणि वरिष्ठांचा दबाव अशा बिकट परिस्थितीमध्ये अडकलेल्या मुजफ्फर यांनी अखेरीस आत्महत्येचा मार्ग स्विकारला आहे. एसटीचा संप सुरु असताना मुजफ्फर यांना कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने लागणार याची खात्री होती. परंतू कोर्टाकडून अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय न आल्याने मुजफ्फर यांची निराशा वाढत गेल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे.
भोगाव येथील एका शिवारातीमधील विहीरीत उडी मारुन मुजफ्फर यांनी आपले आयुष्य आज संपवले. या घटनेची माहिती कळताच आंदोलकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मुजफ्फर यांचा मृतदेह आंदोलनस्थळी आणण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. यावेळी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.