पुणे – यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीमध्ये (First class) जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिकण्याचा आनंद आता द्विगुणीत होणार आहे. पहिलीपासूनच विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचं एकात्मिक द्विभाषिक पाठ्यपुस्तक (Integrated bilingual textbook) आता इयत्ता पहिलीमधील विद्यार्थ्यांना (Student) देण्यात येणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या जूनमध्ये लाखो विद्यार्थ्यांच्या हातामध्ये ‘सृजन बालभारती’चे पुस्तक दिसणार आहे. या पुस्तकामुळे प्राथमिक शाळेतीमधील आणि वय वर्षे आठपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी अनेक भाषा शिकण्याची संधी मिळणार आहे.
तसेच सर्व मराठी आणि उर्दू शाळांमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाचं एकात्मिक द्विभाषिक पाठ्यपुस्तक दिलं जाणार आहे. अन्य बोर्डाच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार या नव्या पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
या पुस्तकासाठी शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत असून अधिकृत निर्णय आल्यानंतरच पाठ्यपुस्तकाच्या छपाईचे प्रत्यक्ष काम सुरू केले जाणार आहे.
‘सृजन बालभारती’ची खास वैशिष्टे
- आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकात्मिक द्विभाषिक पाठ्यपुस्तक
- भाषा, गणित, इंग्रजी आणि खेळू करू शिकू विषयांचा एकत्रित विचार
- विद्यार्थ्यांना अनुभवावर आधारित आजूबाजूच्या परिसरातून आशय होणार स्पष्ट
- विद्यार्थ्यांच्या कृती आणि विचाराला प्राधान्य
- अक्षर आणि अंक ज्ञानातील तत्त्वे आणि संकल्पनावरून आशयनिर्मिती
- कृती, खेळ, कोडी, चित्रकला, गोष्टी आणि गाणी यांचा उपयोग