लंकेने घेतला भारताचा बदला, पाकचा पराभव करत बनले Asia Cup 2022 विजेते

WhatsApp Group

Asia Cup 2022 : दुबई येथे खेळल्या गेलेल्या 2022 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला आहे. अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ 147 धावाच करू शकला. श्रीलंकेने आठ वर्षांनंतर आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे.

वनिंदू हसरंगा आणि भानुका राजपक्षे हे श्रीलंकेच्या या शानदार विजयाचे नायक होते. हसरंगाने चेंडू आणि बॅट या दोन्ही बाजूंनी चमकदार कामगिरी केली. हसरंगाने प्रथम 21 चेंडूत 36 धावांची धडाकेबाज खेळी केली आणि त्यानंतर महत्त्वाचे तीन बळी घेतले. दुसरीकडे राजपक्षेने 71 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज प्रमोद मधुशननेही या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 34 धावांत चार बळी घेतले.

भानुका राजपक्षे (45 चेंडूत नाबाद 71 धावा) आणि वानिंदू हसरंगा (21 चेंडूत 36 धावा) यांच्या आक्रमक खेळीने श्रीलंकेला 20 षटकांत 170/6 पर्यंत नेले. राजपक्षे आणि हसरंगा यांच्या व्यतिरिक्त, धनंजया डी सिल्वा (21 चेंडूत 28) आणि चमिका करुणारत्ने (14 चेंडूत नाबाद 14) यांनीही श्रीलंकेसाठी महत्त्वपूर्ण खेळी खेळली. पाकिस्तानकडून हरिस रौफ (3/29) यांनी तीन बळी घेतले, तर इफ्तिखार अहमद (1/21), शादाब खान (1/28) आणि नसीम शाह (1/40) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवानने सुरेख अर्धशतक (49 चेंडूत 55 धावा) आणि इफ्तिखार अहमदने (31 चेंडूत 32 धावा) झळकावून बाद होण्यापूर्वी पाकिस्तानला जिवंत ठेवले. मात्र, इतर फलंदाज योगदान देऊ शकले नाहीत आणि पाकिस्तानला 20 षटकांत केवळ 147 धावा करता आल्या. श्रीलंकेकडून प्रमोद मदुशन (4/34) आणि वनिंदू हसरंगा (3/27) यांनी सर्वाधिक बळी घेतले, तर चमिका करुणारत्ने (2/33) आणि महेश थेक्षना (1/25) यांनीही महत्त्वाचे बळी घेतले.