मुंबई : ज्येष्ठ क्रीडा विश्लेषक आणि समीक्षक वि.वि.करमरकर यांचं मुंबईत आज निधन. मराठी दैनिकांमध्ये सर्वप्रथम क्रीडा पान सुरू करणारे अशी त्यांची करमरकर सरांची ओळख होती. आज सकाळी मुंबईत अंधेरी इथे त्यांचं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते.
मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक,पत्रकार वि.वि.करमरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, दिवंगत करमरकर यांनी क्रीडा जगताला वृत्तपत्रात हक्काचे स्थान मिळवून दिले. त्यांनी वृत्तपत्रांत क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसाठी स्वतंत्र पान सुरू करण्यात पुढाकार घेतला. या अर्थाने ते मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक ठरले.
वि.वि.करमरकर यांनी क्रीडा क्षेत्रातील इंग्रजी शब्दांना सोपे आणि लक्षवेधी असे मराठी प्रतिशब्द मिळवून दिले. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. करमरकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक, पत्रकार वि.वि. करमरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मराठी पत्रकारितेत क्रीडा पत्रकाराला आणि क्रीडा पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वि. वि. करमरकर यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राचा मार्गदर्शक हरपला आहे. लेखक, समीक्षक, संपादक, समालोचक अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी क्रीडा क्षेत्राची सेवा केली, अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ क्रीडा विश्लेषक आणि समीक्षक वि.वि.करमरकर यांचं मुंबईत आज निधन. #VVKarmarkar @DDNewslive #Mumbai pic.twitter.com/iCMVMBb2uV
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 6, 2023
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “ वि. वि. करमरकर यांनी लोकांमध्ये खेळाविषयी प्रेम निर्माण व्हावे यादृष्टीने विविध उपक्रम राबविले. खेळ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे, यासाठी ते आग्रही होते. त्यांच्या प्रेरणेनेच मराठी दैनिकांत क्रीडा पान सुरू झाले. खेळाचे प्रचंड ज्ञान आणि त्यावर नेमक्या शब्दांत भाष्य करण्याची हातोटी यामुळे लोक एखादा सामना पूर्ण बघितल्यानंतरही करमरकर यांनी त्याविषयी काय लिहिले आहे, यासाठी वर्तमानपत्राची वाट बघायचे. त्यांच्या निधनाने एक नवा प्रवाह सुरू करणारा पत्रकार आपण गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर त्यांना देवो, हीच प्रार्थना. ”