IND vs SA 2nd T20 : आफ्रिकेचा सलग दूसरा विजय, भारताचा 4 विकेट्स राखून केला पराभव!

WhatsApp Group

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना भारताने आफ्रिकेसमोर 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आफ्रिकन संघाने हे लक्ष्य 18.2 षटकांत पूर्ण करत या मालिकेतील सलग दूसरा विजय मिळवला आहे. हेनिरक क्लासेनच्या 81 धावांच्या बळावर आफ्रिकेने भारताचा पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारताला पहिल्याच षटकात गायकवाडच्या रुपात पहिला झटका बसला. तो अवघ्या एक धावा करत बाद झाला. त्यानंतर ईशान किशन 34 व ऋषभ पंत 5 धावांवर तंबूत परतले. हार्दिक पंड्याही अवघ्या 9 धावांवर त्रिफळाचित झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर 40 व अक्षर पटेल 10 धावांवर बाद झाले. दिनेश कार्तिक व हर्षल पटेलने शेवटच्या षटकात 18 धावा केल्या. त्यामुळे भारताचा स्कोअर 148 या समाधानकारक आकड्यापर्यंत पोहोचला.

भारताने दिलेले 149 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. रेजा हेन्ड्रिक्स 4 धावा करत बाद झाला. त्यामागोमाग प्रीटोरियस देखील 4 धावा करत झेलबाद झाला. कर्णधार तेम्बा बावुमाने संघाला सावरले मात्र तोही 30 चेंडूत 35 धावांवर बाद झाला. त्यानंतर हेनरिक क्लासेन दमदार फलंदाजी करत 46 चेंडूत 81 धावांवर बाद झाला. भारताने 149 धावांचे दिलेले आव्हान आफ्रिकन संघाने18.2 षटकांत पूर्ण केले आणि या मालिकेतील सलग दूसरा विजय मिळवला. या सामन्यात आफ्रिकेने भारताचा 4 विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताकडून गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 13 धावा देत 4 बळी घेतले. युझवेंद्र चहलने 4 षटकात 1 बळी घेतला पण तो चांगलाच महागात पडला. चहलने 12.25 च्या इकॉनॉमीमध्ये 49 धावा दिल्या. हर्षल पटेलने 3 षटकात 17 धावा देत 1 बळी घेतला, याशिवाय अन्य कोणत्याही भारतीय गोलंदाजाला विकेट मिळवता आली नाही.