क्विंटन डी कॉक – द फॅमिली मॅन

WhatsApp Group

दक्षिण आफ्रिकेचे लक्ष्य तसे फार दूर होते. पहिल्या डावामध्ये त्यांची फलंदाजी कोसळल्यानंतर भारताने त्यांच्यासमोर ३०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ९४/४ ही परिस्थिती असताना कर्णधार एल्गारच्या जोडीला आला क्विंटन डी कॉक. दोघांच्या ३६ धावांच्या भागीदारी नंतर एल्गार बाद झाला. इतके मोठे लक्ष्य पार करायचे तर परिस्थितीनुसार फटकेबाजी गरजेची होती. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेला कोणी विजय मिळवून देऊ शकला असता तर तो केवळ डी कॉक. मात्र सिराजने त्याला त्रिफळाचीत केले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. पुढील दोन कसोटी डी कॉक उपलब्ध राहणार नव्हता मात्र त्याच रात्री त्याने क्रिकेट विश्वाला धक्का देणारा निर्णय जाहीर केला तो म्हणजे कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा.

कसोटी क्रिकेटच्या जवळपास पहिल्या १२० वर्षांमध्ये यष्टीरक्षकाची भूमिका ही “स्पेशालिस्ट” म्हणून असायची. उत्तम विकेटकिपिंग करणे ही त्यांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी. त्यांनी तळाला येऊन धावा करणे हे बोनस समजले जाई. मात्र ॲडम गिलख्रिस्ट, अँडी फ्लॉवर, कुमार संगाकारा अशांनी मिळून या भूमिकेला नवीन पैलू पाडले. क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकाकडून ठेवल्या जाणाऱ्या अपेक्षा उंचावल्या. त्यानंतर आलेल्या महेंद्र सिंग धोनी, मुशफिकूर रहिम, एबी डिव्हिलियर्स यांनी फलंदाजीची नवी शिखरे गाठली. याच परंपरेतील पुढील नाव होते ते क्विंटन डी कॉकचे.

मर्यादित षटकांच्या खेळात नाव कमावल्यानंतर डी कॉकची वर्णी दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात लागली ती २०१४ मध्ये. सुरुवातीच्या सहा-सात कसोटी सामन्यांमध्ये त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. जानेवारी २०१६च्या सेंचुरियन कसोटी मध्ये त्याने कसोटीमधील आपले पहिले शतक झळकावले. इंग्लंडविरुद्ध नंबर सातला येत टोलेबाजी करत होता त्याने नाबाद १२९ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका नोंदवली. २०१६ पासून अगदी काही कसोटी सामने सोडल्यास दक्षिण आफ्रिकेचा मुख्य यष्टिरक्षक म्हणून डी कॉकने नाव कमावले. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या एकूण ५४ कसोटी सामन्यांमध्ये ३ हजार ३०० धावा ३८.८२च्या सरासरीने केल्या आहेत. यात ६ कसोटी शतके आणि २२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सहा पैकी तीन कसोटी शतके दक्षिण आफ्रिके बाहेर आहेत. याचसोबत यष्टिरक्षक म्हणून त्याने २२१ झेल आणि ११ यष्टीचीत नोंदवले आहेत.


निवृत्तीनंतर दिलेल्या निवेदनात डी कॉकने आपल्या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले आहे. ‘हा निर्णय माझ्यासाठी अजिबात सोपा नव्हता. मी माझ्या भविष्याबद्दल खूप विचार केला. आता माझी प्राथमिकता माझी पत्नी साशा आणि येणार माझं मुल आहे. माझ कुटुंब माझ्यासाठी सर्वकाही आहे. मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे” असे डी कॉकने त्याच्या निवेदनात सांगितले आहे.

टी२० लीग खेळून मिळणाऱ्या बक्कळ पैशामुळे खेळाडूंसाठी कसोटी क्रिकेटचा मार्ग सोडूनसुद्धा खेळात भाग घेणे शक्य झाले आहे. क्विंटन डी कॉकचा निर्णय हा त्याचा वैयक्तिक आहे आणि त्यामुळे इतर नव्या खेळाडूंना संधी मिळेल हे नक्की. मात्र कसोटी क्रिकेटसाठी ही नक्कीच एक धोक्याची घंटा आहे.