मिशन विश्वचषक 2026! दक्षिण आफ्रिकेचा ‘धाकड’ संघ जाहीर; अनुभवी क्विंटन डी कॉकचे पुनरागमन, तर अनेक स्टार खेळाडूंना डच्चू
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, दक्षिण आफ्रिकेने या महाकुंभासाठी आपल्या १५ सदस्यीय बलाढ्य संघाची घोषणा केली आहे. २०२४ च्या विश्वचषकात अगदी जवळ येऊनही विजेतेपदाने हुलकावणी दिल्यानंतर, यावेळी दक्षिण आफ्रिकेने अत्यंत संतुलित आणि वेगवान गोलंदाजीवर भर देणारा संघ निवडला आहे. एडन मारक्रम पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार असून, या निवडीत अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत.
वेगवान गोलंदाजीचे ‘ब्रह्मास्त्र’ आणि रबाडाचे पुनरागमन
दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात दिलासादायक बातमी म्हणजे त्यांचा हुकुमी एक्का कगिसो रबाडा याचे पुनरागमन. बरगड्यांच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ संघाबाहेर असलेला रबाडा आता पूर्णपणे फिट असून तो आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करेल. त्याला साथ देण्यासाठी एनरिक नोर्खिया, मार्को जेनसेन आणि लुंगी एनगिडी यांसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. विशेष म्हणजे, युवा गोलंदाज क्वेना मफाका आणि कॉर्बिन बॉश यांनाही संधी देण्यात आली आहे. या ‘पेस बॅटरी’मुळे आफ्रिकेचा संघ कोणत्याही फलंदाजी फळीला उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवतो.
डी कॉकची निवृत्ती मागे; फलंदाजी फळीत मोठे फेरबदल
यावेळच्या संघ निवडीतील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे स्फोटक फलंदाज क्विंटन डी कॉकचे पुनरागमन. निवृत्तीच्या निर्णयावरून मागे फिरत तो पुन्हा एकदा विश्वचषकात सलामीला दिसणार आहे. त्याच्यासोबत ‘बेबी एबी’ म्हणून ओळखला जाणारा डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी झोरझी आणि अनुभवी डेविड मिलर फलंदाजीची धुरा सांभाळतील. मात्र, २०२४ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ट्रिस्टन स्टब्स, रीजा हेंड्रिक्स आणि रियान रिकेल्टन यांसारख्या खेळाडूंना संधी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. फिरकीची जबाबदारी केशव महाराज आणि ऑलराउंडर जॉर्ज लिंडे यांच्या खांद्यावर असेल.
२०२४ च्या पराभवाचा बदला घेण्याची संधी
दक्षिण आफ्रिकेचा संघ आजही २०२४ च्या त्या वेदनादायी पराभवाच्या सावलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. बार्बाडोस येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते. हेनरिक क्लासेन आणि डेविड मिलर मैदानावर असताना आफ्रिका विजयाकडे वाटचाल करत होती, परंतु भारताने शेवटच्या षटकांत बाजी पलटवली. या कटू आठवणींना मागे सारून आणि गेल्यावेळच्या चुका सुधारून आफ्रिकेचा संघ आता चॅम्पियन बनण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
टी-२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघ: एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), कगिसो रबाडा, डेविड मिलर, एनरिक नोर्खिया, मार्को जेनसेन, लुंगी एनगिडी, केशव महाराज, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी झोरझी, डोनोवन फरेरा, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका, कॉर्बिन बॉश, जेसन स्मिथ.
