
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. डावखुरा फलंदाज दादा लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये एक खास क्रिकेट सामना खेळताना दिसणार आहे, ज्याचा खुलासा त्याने स्वतः केला आहे. भारतीय चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच असेल.
गांगुलीने इंस्टाग्रामवर जाहीर केले की तो लेजेंड्स लीग क्रिकेटच्या सीझन 2 मध्ये एक विशेष सामना खेळणार आहे. अलीकडेच LLC ने जाहीर केले की आगामी हंगाम भारतात आयोजित केला जाईल. त्यामुळे भारतीय चाहत्यांना सौरव गांगुली पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळणार आहे. मात्र, हा चॅरिटी सामना असेल. गांगुलीने या सामन्याची तयारी सुरू केली असून तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. गांगुलीने जिमचे स्वतःचे फोटो देखील पोस्ट केले आहेत आणि या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने आपण लीजेंड्स लीग क्रिकेट खेळणार असल्याची पुष्टी केली आहे.
View this post on Instagram
सौरव गांगुलीने 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्याने सर्व फॉरमॅटमध्ये 18,575 धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील 195 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि त्यापैकी 97 जिंकले. गांगुलीने 1996 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले आणि लॉर्ड्सवरील त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. या डावखुऱ्या फलंदाजाने दुसऱ्या कसोटीतही शतक झळकावले होते.