
प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी (३० मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले. ‘वॉईज ऑफ लव्ह’ अशी ओळख असणारे कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’च्या मृत्यूमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘केके’च्या निधनानंतर अभिनेत्री सोना मोहपात्रा हिला जबरदस्त धक्का बसला आहे. ‘केके’ने पुरानी जीन्स या चित्रपटामधील दिल आज कल हे गाणे गायले होते. यानंतर अभिनेत्री सोना मोहपात्रा हिने यावर एक प्रतिक्रिया दिली आहे.
एका वृत्तपत्राशी बोलताना सोना म्हणाली, “केके यांच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून मला धक्का बसला आहे. काही सेकंद माझ्या मेंदूने काम करणे बंद केले होते. मलाही अशाचप्रकारे लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करता करता मरण यावे असे वाटते. मला माझे जीवन हे संगीतमय पद्धतीने घालवायचे आहे.
केकेंसोबतच्या आठवणींना उजाळा देत सोना मोहपात्रा पुढे म्हणाली, “केके एक उत्कृष्ट गायक होते. केके ग्लॅमरपासून लांब राहायचे. त्यांनी कधीही कोणत्याही स्पर्धेत स्वतःला कमी लेखले नाही, ते त्यांच्या नियमांवर आणि वचनांवर ठाम होते. त्यांनी खूप गाणी गायली. परंतु कधी पक्षपात केला नाही, किंवा कोणत्याही गटाचा भाग बनले नाही. ते लाजाळू आणि कौटुंबिक व्यक्ती होते.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.