कमालच! सोलापूरचे ‘पाटील’ गुरुजी वाचतात उलटे पुस्तक…
सोलापूर – सध्याच्या जगात कोणी काही आत्मसात करेल हे सांगता येत नाही. अनेकांनी अशक्य ते शक्य करून दाखवण्याची किमया करून दाखवली आहे. अभ्यास करत असताना पुस्तकं समोर धरून वाचण्याची पद्धत प्रचलित असताना सोलापूरच्या एका शिक्षकाने वर्गात शिकवत असताना चक्क उलटे पुस्तक वाचून विध्यार्थ्यांना शिकवण्याची कला आत्मसात केली आहे. उलटे पुस्तक धरून वाचण्याच्या या अनोख्या पद्धतीची सध्या जोरदार चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे. सोलापूरातील या अनोख्या शिक्षकांचे नाव आप्पासाहेब सिद्राम पाटील असं आहे.
आप्पासाहेब पाटील हे गेल्या २९ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करतात. ते समाजशास्त्र आणि हिंदी या विषयाचे शिक्षक आहेत. १९९३ साली ते शिक्षक म्हणून रुजू झाले. सध्या ते दक्षिण सोलापूर येथील श्री भगवती गौरी माता प्रशाला येथे ते विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पुस्तक उलटे धरून वाचण्याची पद्धत विद्यार्थ्यांमध्ये देखील लोकप्रिय ठरतेय. आप्पासाहेब पाटील यांनी बोलताना सांगितले की, भाषा विषय सोडून वर्गात मुलांना इतिहास, भूगोल शिकवताना हातात पुस्तक घेऊन शिकवण्याची पद्धत नव्हती.
श्री. पाटील सर सांगतात की, पूर्वी वर्गात शिकवत असताना पाठीमागे सुपरवायझर म्हणून शाळेचे मुख्याध्यापक बसत असत. मुख्याध्यापक वर्गात शिक्षक कसा शिकवतो याचे निरीक्षण ते करत असत. त्यामुळे मी घरून पॉइंट्स काढून आणत असे व मुलांना त्याप्रमाणे शिकवत असे. काही वेळेस चुकन जर एखादा मुद्दा माझ्याकडून सुटत असेल, त्यावेळी मी मुलांच्या बाकावर ठेवलेले पुस्तक समोरून उलटे वाचत असे. त्यामुळे एखादा मुद्दा सुटल्यास समोरच्या बाकावर बसलेला मुलाने त्याच्या बाजूने ठेवलेले व माझा बाजूने उलटे असेलेले पुस्तक मी वाचत असे. यामुळे मला जास्त प्रमाणात उलटे पुस्तक वाचण्याची ही अनोखी सवय जडली.
ते म्हणाले, मुलांना वर्गात शिकवत असताना ३५ ते ४० मिनिटे कमी पडत. हा वेळ भरून काढण्यासाठी आणि जास्तीत जास्त मुद्दे विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी मी लांबूनच उलटे पुस्तक वाचून मुलांना मुद्दे समजावून सांगत असे. घरून चार-पाच मुद्दे घेऊन येत आणि ३५ ते ४० मिनिटात मुलांना प्रकरण शिकवत असे. पुढे याचा मला सराव झाला. वर्गात शिकवत असताना मी हे उलटे पुस्तक वाचण्याची कला अवगत करून मुलांना कमी वेळात जास्त माहिती देण्याची किमया साधली आहे. आजही मी उलटे पुस्तक धरुन वाचू शकतो.