SL vs AUS: प्रभात जयसूर्याच्या फिरकीवर ऑस्ट्रेलियाची नाचक्की, दुस-या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा डावाने पराभव

श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 39 विकेट राखून पराभव करत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. यजमानांच्या या विजयात दिनेश चंडिमलसह प्रभात जयसूर्याने महत्त्वाची भूमिका बजावली. चंडिमलच्या द्विशतकामुळे लंकेने पहिल्या डावात 554 धावा केल्या, तर प्रभात जयसूर्याने आपल्या फिरकी गोलंदाजीवर कांगारूंना नमवत दोन्ही डावात 6-6 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 364 धावांवर आटोपला आणि दुसऱ्या डावात पाहुण्या संघाचा डाव 151 धावांत आटोपला. यासह प्रभात जयसूर्याने माजी भारतीय गोलंदाज नरेंद्र हिरवाणीच्या विक्रमाची बरोबरी केली.
प्रभात जयसूर्याने पदार्पणाच्या सामन्याच्या दोन्ही डावात 6-6 बळी घेत माजी भारतीय गोलंदाज नरेंद्र हिरवाणीच्या 34 वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबरी केली. हिरवानी (8-61 आणि 8-75) यांनी 1988 मध्ये चेन्नई येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही डावात 6 किंवा त्याहून अधिक बळी घेतले होते.
A famous victory for the hosts 👏#WTC23 | 📝 https://t.co/rLt7mhNkl4 pic.twitter.com/8W0ktypwK1
— ICC (@ICC) July 11, 2022
प्रभात जयसूर्या पदार्पणाच्या सामन्यात श्रीलंकेसाठी सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज ठरला आहे. 2021 मध्ये, प्रवीण जयविक्रमाने बांगलादेशविरुद्धच्या दोन्ही डावात एकूण 11 विकेट घेतल्या, आता त्याचा विक्रम प्रभात जयसूर्याने 12 विकेट घेऊन मोडला आहे. फलंदाजीत दिनेश चंडिमलने नाबाद 206 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम धावसंख्या करणारा तो श्रीलंकेचा खेळाडू ठरला आहे. त्याने माजी कर्णधार कुमार संगकाराचा विक्रम मोडला आहे. संगकाराने 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करताना 192 धावांची इनिंग खेळली होती.
श्रीलंकेने पहिल्या डावात 554 धावांची मजल मारली. यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात 364 आणि दुसऱ्या डावात 151 धावांत गारद झाला. कांगारूंसाठी दुसऱ्या डावात मार्नस लॅबुशेनने सर्वाधिक 32 धावा केल्या. त्याचवेळी पदार्पण सामना खेळताना डावखुरा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्याने पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात सहा बळी घेत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. त्याच्याशिवाय प्रवीण जयविक्रमाने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या. शानदार गोलंदाजीसाठी जयसूर्याला सामनावीर तर दिनेश चंडिमलला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.