Ladki Bahin Yojana: सहाव्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यावर पाठवण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर दुसऱ्यांदा महिला व बालविकास मंत्री झालेल्या आदिती तटकरे म्हणाल्या की, प्रिय भगिनींच्या खात्यात लवकरच पैसे येतील. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहिण योजना यशस्वीपणे सुरू असल्याचं त्या म्हणाले. विधानसभा निवडणुकीमुळे लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेमुळे रखडलेली ही प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली असून, पात्र भगिनींना टप्प्याटप्प्याने सन्मान निधीचे वाटप करण्यात येत आहे.
महिला व बालविकास मंत्री म्हणाल्या की, योजनेतील हप्ते टप्प्याटप्प्यानं वितरित केले जातील. महाराष्ट्रात गेल्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होती. महाराष्ट्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला पात्र महिलांना 1,500 रुपये प्रति महिना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली होती.
पहिल्या टप्प्यात 12,87,503 पात्र महिला आणि दुसऱ्या टप्प्यात सुमारे 67,92,292 पात्र महिलांना डिसेंबर महिन्यासाठी सन्मान निधी देण्यात येणार आहे. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील आघाडीच्या प्रचंड विजयात या योजनेचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते.
या योजनेंतर्गत सध्या 2.34 कोटी लाभार्थी आहेत. हप्त्यांचे थेट लाभ हस्तांतरण (DBT) कालपासून सुरू झाले आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावर 1,500 रुपये वर्ग करण्यात येणार असून, किती लाभार्थ्यांना ही रक्कम देण्यात आली याची माहिती चार दिवसांनंतर उपलब्ध होणार आहे. नोंदणीनुसार लाभार्थ्यांची संख्या वाढू शकते.