सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवरील वर्चस्वासाठी राणे का आग्रही? वाचा राजकीय समिकरणं

WhatsApp Group

यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या समुद्धी सहकार पॅनेल विरोधात राणेंचं सिद्धिविनायक पॅनेल आमनेसामने आहे. एकूण १९ जागांसाठी ३९ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. ३१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. बँकेवरील वर्चस्व नारायण राणे पुन्हा मिळवणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज मतदान होतंय. या निवडणुकीवरुन तळकोकणातलं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा थेट सामना या निवडणुकीत रंगला आहे. बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांचे निकटवर्तीय शिवसैनिक संतोष परबांवरील हल्ल्यानंतर सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आमदार नितेश राणे यांच्या अधिवेशनातील ‘म्याव म्याव’ च्या घोषणेनंतर राणे पिता-पुत्रांवरील सेनेच्या संतापामध्ये आणखी भर पडली आहे. या घडामोडींमुळे सेना आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं राजकीय महत्व…

१९८३ साली या बँकेची स्थापना झाली. ३८ वर्षांच्या बँकेच्या कारकिर्दीत २००८ पासून बँकेवर नारायण राणे यांचं वर्चस्व होतं. बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतिश सावंत यांनी राणेंविरोधात बंड करून शिवसेनेची वाट धरली. त्यामुळे बँकेत सत्तांतर झालं. आता या बँकेची सत्ता पुन्हा काबिज करण्यासाठी नारायण राणेंचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आणि भाजप पुरस्कृत पॅनेल होते. काँग्रेस ८, राष्ट्रवादी ७, शिवसेना २, भाजप १, अपक्ष १ असं सध्याचं पक्षीय बलाबल आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या समुद्धी सहकार पॅनेल विरोधात राणेंचं सिद्धिविनायक पॅनेल आमनेसामने आहे. एकूण १९ जागांसाठी ३९ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. ३१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

आरोप-प्रत्यारोप, शिवसैनिकावरील हल्ल्यामुळे गाजली निवडणूक

संतोष परब हल्लाप्रकरण- महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर निवडणुकीच्या तोंडावर जीवघेणा हल्ला झाला. याप्रकरणी आत्तापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आलीय. संशयावरुन नितेश राणे आणि गोट्या सावंत यांची चौकशीही झाली. तेव्हापासून नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. याप्रकरणी नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे. राणेंना जेल होणार की बेल मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

 पक्षांतरावरुन नितेश राणे-सतिश सावंत आमनेसामने

सतिश सावंत जिल्हा बँक निवडणुकीनंतर लगेचच जिंकलेल्या उमेदवारांसह भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा आ. नितेश राणेंनी केला होता. याबाबतचा प्रस्ताव भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीसांकडे पाठवल्याचंही ते म्हणाले होते. राणेंचा हा दावा सावंत यांनी खोडून काढला. जिथे नितेश राणे असतील, त्या पक्षात कधीच जाणार नसल्याचा पलटवार सावंत यांनी केला. नितेश राणेंच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच शिवसेनेत प्रवेश केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

 संस्था उभी करायला डोकं लागतं- अजित पवार

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. दहशतवादाला बळी न पडण्याचं आवाहन करतानाच संस्था उभी करायला डोकं लागतं, असा अप्रत्यक्ष निशाणा त्यांनी राणे पिता-पुत्रांवर साधला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार विनायक राऊत, आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक या दिग्गजांची फळी समृद्धी पॅनेलच्या प्रचारासाठी मैदानात होती.
– समीर आमुणेकर