Sindhudurg Crime: नैराश्याच्या गर्तेत दुर्दैवी शेवट! सिंधुदुर्गात तरुणाने जीवन संपवलं, आत्महत्येमागे नेमकं कारण काय?

WhatsApp Group

सावंतवाडी : फुलाचे दुकान लावण्यास वारंवार अडथळे निर्माण केल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या बांदा येथील तरुणाने अखेर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आफताब कमरूद्दीन शेख (वय ३८, रा. बांदा-मुस्लिमवाडी) असे या तरुणाचे नाव असून, आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ करून आपल्या मृत्यूसाठी बांदा शहरातील पाच जणांना जबाबदार ठरवले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही घटना आज (मंगळवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. आफताब यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर घरच्यांनी त्याला तात्काळ खाली उतरवून बांदा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे नेत असताना, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब याचे बांदा बाजारपेठेत फुलांचे दुकान होते. सुमारे आठ महिन्यांपूर्वी, दुकान लावताना काही स्थानिक तरुणांशी त्याचा वाद झाला होता. त्यावेळी एका तरुणाने “फुलावर थुंकल्याचा” आरोप करत आफताब याला दुकान लावण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर तब्बल आठ महिने तो बेरोजगार राहिला. जत्रेचा सिझन सुरू झाल्याने अलीकडेच त्याने पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच गटातील काही लोकांनी पुन्हा त्याला अडथळा आणल्याचे समजते.

व्यवसाय न झाल्याने आणि घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने आफताब मानसिक नैराश्यात गेला होता. आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने भावनिक शब्दात सांगितले की, “मी व्यवसाय करू शकत नाही, माझ्या कुटुंबाची हालअपेष्टा सुरू आहेत. त्यामुळे माझ्यासमोर आता दुसरा कोणताही मार्ग नाही. माझ्या मुलांची काळजी घ्या.” त्याच व्हिडिओमध्ये त्याने पाच जणांची नावे घेऊन त्यांना आपल्या आत्महत्येस जबाबदार धरले आहे.

या घटनेनंतर आफताबच्या नातेवाईकांनी संतप्त भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “जोपर्यंत संबंधित पाच जणांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही.” या प्रकरणी बांदा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

या घटनेने बांदा आणि परिसरात शोककळा पसरली असून, एक तरुण केवळ उपजीविकेसाठी संघर्ष करत असताना अशा परिस्थितीत जीव देण्याची वेळ येणे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.