कणकवली रेल्वे स्थानकावर १५ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता सिंधुदुर्ग एटीएसच्या पथकाने दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. पकडलेल्या महिलांची नावे अतुल माझी (वय ३२, सध्या रा. कल्याण ईस्ट, मुंबई, मूळ रा. लेबु खाली, ता. डोगरी, जिल्हा ढाका, बांगलादेश) आणि लिझा रहीम शेख (वय २८, सध्या रा. बी-विंग मेरिडियन गोल्ड सोसायटी, हडपसर, पुणे, मूळ रा. ढाका, बांगलादेश) अशी आहेत.
एटीएस पथकाला दोन बांगलादेशी महिला विना पासपोर्ट किंवा कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय कणकवलीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, एटीएस पथक मध्यरात्री ३ वाजल्यापासून कणकवलीत तैनात होते. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने त्यांनी कणकवली रेल्वे स्थानकावर दबा धरला. पहाटे साडेपाच वाजता त्या महिलांना पकडण्यात आले.
ही कारवाई एटीएस पथकातील पीएसआय सुखदेव शेवाळे, एएसआय उन्मेष पेडणेकर, पोलीस नाईक रोहन सावंत यांच्यासह कणकवली पोलिस ठाण्यातील पोलीस नाईक रुपेश गुरव, अंमलदार किरण मेथे आणि महिला अंमलदार सुप्रिया भागवत यांनी केली. पकडलेल्या महिलांना कणकवली पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर विदेशी पारपत्र कायदा १९५० अंतर्गत कलम १४(अ), नियम ३(ए) व ६(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला कणकवलीत कशा पोहोचल्या? त्या इथे कधीपासून होत्या? त्या इथे कोणाकडे राहत होत्या? त्यांच्यासोबत इतर साथीदार होते का? कणकवलीत येण्यामागचा उद्देश काय होता? या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. या सर्व गोष्टींचा तपास कणकवली पोलीस अधिक सखोलपणे करणार आहेत.
ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी या संदर्भात कसून चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांची सतर्कता आणि देशातील परदेशी नागरिकांच्या चाचणी प्रक्रियेतील त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत. नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.