Sindhudurg Amboli |धबधब्यांच गाव….. आंबोली

WhatsApp Group

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंबोली हे ठिकाण निसर्ग पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणून आंबोलीत पर्यटकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. आंबोलीत गावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्याखाली भिजण्यासाठी पुणे, मुंबई, ठाणे ,कोल्हापूर, गोवा आणि कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. आंबोलीतला धबधबा हा पर्यटकांना भुरळ घालतो. म्हणूनच पर्यटक धबधब्याखाली तासंतास ओलेचिंब होऊन नाचत परमसुख अनुभवत असतात. या धबधब्याखाली भिजण्यासाठी पर्यटकांची जणू झुंबडच उडालेली असते पावसाळ्यात धबधब्याजवळ मोठ्या प्रमाणत पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. कर्नाटक व गोवामधून मोठ्या प्रमाणत पर्यटक इथे येत असतात. जसे लोणावळा व खंडाळा हे पुणे आणि मुंबई येथील पर्यटकांसाठी लोकप्रिय आहे तसेच बेळगाव व गोव्याच्या पर्यटकांचे आंबोली हे आवडते ठिकाण आहे.

 

आंबोलीमध्ये मुख्यतः पावसाळ्यातील रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची प्रचंड झुंबड उडालेली असते. अनेकदा या पर्यटकांच्या अचानक आलेल्या ओघामुळे वाहतुकीची देखील मोठी कोंडी होते. आंबोलीत अनेक ठिकाणी उंच उंच डोंगर रांगा वरून कोसळणारे धबधबे, अधूनमधून रिमझिम कोसळणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे येथील वातावरणात नैसर्गिक संगीत निर्माण होऊन मंत्रमुग्ध झालेले असते. आंबोलीला अतिशय सुंदर नैसर्गिक असे सौंदर्य लाभलेले आहे. येथिल वातावरण खूप आल्हाददायक आहे. येथील हवेमध्ये वेगळीच ऊर्जा जाणवते. प्रत्येक श्वासात नवचैतन्याची जाणीव होते. म्हणून रिफ्रेश होण्यासाठी आणि नवीन ऊर्जा मिळविण्यासाठी पर्यटक आंबोलीला भेट देत असतात. आंबोली घाटातील नयनरम्य परिसर कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहण्यासाठी अनेक पर्यटक फोटो कॅमेरा घेऊन आलेले असतात. म्हणून रस्त्याने जागोजागी पर्यटक फोटो काढताना सर्रास पाहायला मिळतात.

जाणून घ्या शिरशिंगे येथील मनोहर-मनसंतोष या ऐतिहासिक गडाचा इतिहास

 

आंबोली घाट हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा दुवा आहे. आंबोलीला जाताना नागमोडी वाटेने प्रवास करावा लागतो. हा प्रवास अतिशय रोमांच्याने भरलेला असतो. शिवाय या प्रवासामध्ये जवळून निसर्ग न्याहाळण्याचा अद्भुत अनुभव मिळतो. निसर्गाशी एकरूप होता येते. आंबोलीचे पर्यटन म्हणजे लहान मुले व युवकांसाठी एक पर्वणीच आहे. आंबोली घाटाच्या प्रवासादरम्यान घाटातील माकडे आपल्यासमोर अगदी न घाबरता समोर येतात. येथे येणाऱ्या पर्यटकांनी या माकडांना खाद्य दिल्यामुळे व सतत पर्यटकांच्या सहवासात राहिल्यामुळे या माकडांना आता माणसाची भीती राहिली नाही. येथील माकडे अतिशय निडर होऊन पर्यटकांच्या जवळ येतात.

 

आंबोली ते धबधब्या पर्यंत रस्त्याने जात असताना रस्त्यात मक्याचे कणीस चहा, वडे, यांच्या अनेक छोट्या हॉटेल्स आहेत. नेहमी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असल्यामुळे येथे नेहमी पोलिसांचा बंदोबस्त देखील असतो. येथे पावसाळ्यात संपूर्ण दिवसभर दाट धुके सर्वत्र पसरलेले असते. अगदी या धुक्यामुळे रस्त्याने वाहने चालवणे अवघड होऊन जाते. आंबोलीला पर्यटनाला जात असाल तर पावसात भिजणे हे पक्क आहे. पावसात भिजणे हे या पर्यटनाचा अविभाज्य भाग आहे. जसे देवदर्शनाला गेले आणि देवाचे दर्शन नाही घेतले असाच काहीसा हा प्रकार आहे. म्हणून धबधब्याकडे जातांना मोबाईलफोन, कॅमेरे इत्यादी वस्तूंची काळजी घ्यावी लागते. आंबोलीच्या धबधब्याखाली मनोसक्त भिजून गरमा गरम चहाचा आस्वाद..म्हणजे लाजवाब. त्यातच गरमागरम मक्याच्या कणसाला लिंबू लावून खाण्याच्या आनंद परमसुख देऊन जाते.

 

आंबोली गावापासून साधारण ४ किलोमीटर अंतरावर पार्वतीचे मातेचे मंदिर आहे येथून हिरण्यकेशी हि नदी उगम पावते. येथे येणारे पर्यटक पार्वती देवीचे दर्शन घेऊन आजूबाजूचा नयनरम्य परिसराचा आनंद घेत असतात. हिरण्यकेशी नदीच्या उगमा बद्दल येथील स्थानिक एक आख्यायिका सांगतात त्यानुसार माता पार्वतीसाठी महादेवाने जलगंगा म्हणजे हिरण्यकेशी नदीची निर्मिती केली. पार्वतीच्या मंदिरा समोर एक छोटा तलाव आहे. या तलावात गोमुखातुन पाणी पडते. येथेच जवळ एक गुहा आहे. या गुहांबाबत सुद्धा अनेक रंजक कथा स्थानिकांनी सांगितल्या आहेत त्यात हि गुहा दोन ते तीन किलोमीटर आत लांब आहे, आत सात तळी आहेत वैगरे वैगरे. हिरण्यकेशी नदीच्या उगमापासून पुढे ‘नांगरतास’ धबधबा आहे .आंबोली पासुन नांगरतास धबधब्याचे अंतर साधारण ८ किमी असेल. येथेही पर्यटनासाठी जाता येते. आंबोलीच्या परिसरात स्थानिक जाणकार किंवा गाईडची मदत अवश्य घ्यावी. यामुळे वेळ वाचतो व पर्यटन अधिक सुकर होते.

कावळेशेत पॉईंट हा आंबोलीतील सर्वांच्या आकर्षणाचा पॉईंट आहे. कावळेशेत पॉईंट या पॉईंटवर गेल्यावर अतिशय खोल उरात धडकी भरविणारी दरी आपल्या नजरेस पडते. म्हणून ज्यांना उंच जागेची भीती वाटते अशांनी येथे जाणे टाळलेले बरे. या व्हिव पॉइंटला कावळेशेत पॉईंट हे नाव का पडले याचे कारण फार रंजक आहे. याबद्दल स्थानिकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या दरीतुन उलट्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग प्रचंड असते. या वाहणाऱ्या वार्‍यामुळे दरीत कावळे ऊडु शकत नाहीत म्हणून या दरीला कावळेशेत पॉईंट पडले असं सांगितलं जातं. परुंतु स्थनिकांकाकडून मिळालेले हे उत्तर अतिशय गमतीदार होते. या दरीत भिरकावलेली कोणतीही वस्तु ती दरीत खाली न पडता विरुद्ध दिशेने येणाऱ्या हवेच्या दबावामुळे पुन्हा बाहेर फेकली जाते. त्यामुळे येथे पर्यटक रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, हातरुमाल, टोपी दरीत भिरकावतात आणि पुन्हा वर आल्यावर झेलतात. परंतु असे करणे अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे मज्जा मस्ती करताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे.