मुंबई: आयपीएल २०२६ च्या २४ व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने सीमारेषेवर असा काही अचाट पराक्रम केला, ज्याची चर्चा आता जगभरात होत आहे. श्रेयसने दाखवलेली चपळता आणि प्रसंगावधान पाहून मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये बसलेले दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवही अवाक झाले.
मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज हार्दिक पंड्या मैदानावर होता. मार्को यानसेनच्या चेंडूवर हार्दिकने समोरच्या दिशेने एक उत्तुंग शॉट मारला. चेंडू थेट बाऊंड्रीच्या दिशेने वेगाने जात होता. तिथे लॉन्ग ऑनवर श्रेयस अय्यर आणि लॉन्ग ऑफवर स्वतः गोलंदाज मार्को यानसेन तैनात होते. श्रेयसने हवेत झेप घेत चेंडू टिपला, पण त्याचा तोल जात होता आणि तो सीमारेषेच्या बाहेर जाणार होता. अत्यंत हुशारीने त्याने हवेत असतानाच चेंडू यानसेनच्या दिशेने फेकला. यानसेनने तो सहज झेलला आणि हार्दिक पंड्याची मोठी खेळी संपुष्टात आली.
रोहित आणि सूर्या झाले हैराण
हा सर्व प्रकार मुंबई इंडियन्सच्या डगआऊटच्या अगदी समोर घडला. हा झेल पाहिल्यानंतर सूर्यकुमार यादवचा तर आ वासलेलाच राहिला, तो आश्चर्याने श्रेयसकडे पाहतच बसला. तर रोहित शर्माही सूर्याकडे अत्यंत चकित होऊन पाहत होता. दोघांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. दुसरीकडे, श्रेयस अय्यरने प्रेक्षकांकडे पाहत दिमाखात या विकेटचा जल्लोष साजरा केला.
