श्रेयसने मोडला विराटचा विक्रम, श्रेयस ठरला ३ सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू
भारताने रविवारी तिसर्या आणि शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका ३-० ने क्लीन स्वीप केली. या मालिकेत श्रीलंकेच्या गोलंदाजांना भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला बाद करता आले नाही. तिसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरने नाबाद ७३ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. यासह श्रेयस अय्यरने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढला. अय्यर तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. या मालिकेत त्याने तीन डावात एकूण २०४ धावा केल्या आहेत.
२०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत विराट कोहलीने १९९ धावा केल्या होत्या. यापूर्वी कोहलीने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १८३ धावा केल्या होत्या. श्रेयस अय्यरने पहिल्या सामन्यात २८ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात त्याने ४४ चेंडूत नाबाद ७४ धावा केल्या, जी त्याची मालिकेतील सर्वोच्च धावसंख्याही होती. तिसऱ्या सामन्यात अय्यरने ४५ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी केली.
फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यरच्या नाबाद ७३ धावांच्या जोरावर भारताने रविवारी तिसर्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा १९ चेंडू राखून सहा विकेट राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका ३-० ने क्लीन स्वीप केली.
तिसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने २० षटकांत ५ बाद १४६ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. भारताने १६.५ षटकांत ४ बाद १४८ धावा करून मालिकेत क्लीन स्वीप केला. पुन्हा एकदा भारताच्या विजयाचा हिरो ठरलेल्या श्रेयस अय्यरने ४५ चेंडूंत नऊ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ७३ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली.