
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सारशिव गावातील महिला सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तु फुकट सरपंच झाली असं म्हणत 14 ते 15 लोकांनी या महिला सरपंचाच्या घरात घूसून तिला मारहाण केली आहे. एवढचं नव्हे तर या लोकांनी सरपंच महिलेच्या मुलांना देखील मारहाण केली. या घटनेत महिला सरपंचाचा हात फॅक्चर झाला आहे.
मारहाण करण्यात आल्यानंतर महिला सरपंच रमाबाई जाधव यांनी सुरुवातीला जानेफळ पोलीस स्टेशन गाठले. मात्र, तेथे त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. नंतर थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे या सरपंच महिलेने तक्रार दाखल केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यलयामधून तक्रार घेऊन त्या महिलेला पुन्हा जानेफळ पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले.