प्रसिद्ध उद्योगपती आणि फरारी आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्या याच्याविरुद्ध मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुमारे 17 भारतीय बँकांचे कर्ज चुकविल्याप्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कर्ज फेडण्यासाठी विजय मल्ल्याकडे पुरेसा पैसा होता, तरीही त्याने कर्जाची परतफेड केली नाही, असा आरोप आहे.
2015-16 मध्ये इंग्लंड आणि फ्रान्समध्ये 330 कोटींची मालमत्ता खरेदी केली
मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. कर्ज फेडण्याऐवजी त्याने देशातून पळून जाण्यापूर्वी परदेशात मालमत्ता खरेदी केल्याचा आरोपही सीबीआयने केला आहे. मल्ल्या यांनी संपूर्ण युरोपमध्ये खाजगी मालमत्ता खरेदी केल्याचा आणि स्वित्झर्लंडमधील त्यांच्या मुलांच्या ट्रस्टला पैसे हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. तसेच 2015-16 मध्ये इंग्लंड आणि फ्रान्समध्ये 330 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे. 17 बँकांचे 900 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. कर्ज फेडण्यासाठी विजय मल्ल्याकडे पुरेसा पैसा होता, तरीही त्याने कर्जाची परतफेड केली नाही, असा आरोप आहे.
परदेशात मालमत्ता खरेदी
सीबीआय कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार, विजय मल्ल्या यांनी 2015-16 मध्ये ब्रिटनमध्ये 80 कोटी रुपयांची आणि 2008 मध्ये फ्रान्समध्ये 250 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. त्या वेळी एअरलाइन्सकडे रोखीची तीव्र टंचाई होती आणि मल्ल्या यांनी बँकेचे कर्ज चुकवले. मल्ल्याकडे 2008 ते 2016-17 या काळात भरपूर पैसा असल्याचा दावाही आरोपपत्रात करण्यात आला आहे. मात्र, त्यांनी बँकांचे कर्ज फेडले नाही. विजय मल्ल्या 900 कोटी रुपयांच्या आयडीबीआय बँक-किंगफिशर एअरलाइन्स कर्ज फसवणूक प्रकरणातील आरोपी आहे. त्याची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी सुरू आहे.