
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर एका महिला प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने महिलेला पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमधून खाली फेकले. ही घटना 6 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पुण्याहून मुंबईला येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसच्या महिला डब्यातील एका व्यक्तीने दादर रेल्वे स्थानकावर महिलेला चालत्या ट्रेनमधून खाली फेकले. सुदैवाने महिला वाचली. पीडितेने (29) पोलिसांना सांगितले की, एका व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला आणि तिने विरोध केल्यावर आरोपीने तिला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले. रविवारी रात्री 8.30 वाजता ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिलेने पोलिसांना पुढे सांगितले की, ट्रेन दादर स्टेशनच्या फलाटावर आली तेव्हा महिला डब्यातील सर्व महिला खाली उतरल्या. पीडित महिला त्या डब्यात एकटी होती, हे पाहून आरोपी त्या डब्यात चढला. पीडितेने त्याला विरोध केला असता आरोपीने तिला चालत्या ट्रेनमधून फेकून दिले. सुदैवाने ती ट्रेनमधून फेकली गेली तेव्हा ट्रेनने फलाट ओलांडला नव्हता आणि ती प्लॅटफॉर्मवर पडली आणि जखमी होऊन बेशुद्ध झाली.
सीएसएमटी स्थानकातून आरोपीला अटक
पोलिसांनी आरोपीला छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने दारू प्यायली होती आणि जेव्हा महिलेने त्याला महिलांच्या डब्यात चढण्यास आक्षेप घेतला तेव्हा आरोपीने महिलेला ट्रेनमधून ढकलले. या प्रकरणी दादर जीआरपीने आरोपीविरुद्ध भादंवि कलम 307, 394, 354, 150(1)(ई), 153, 137, 147, 162अन्वये गुन्हा दाखल केला आहे.