देशातल्या ५ राज्यांमध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत विविध टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. सर्व राज्यांमध्ये मतमोजणी १० मार्चला करण्यात येणार आहे. देशात सत्तेचा मार्ग उ. प्रदेशातून जात असल्यानं या निवडणुकांकडे मिनी लोकसभा म्हणून देखील पाहिलं जात आहे.उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी अनेक राज्यांमध्ये विरोधी पक्षांनी युती केली आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता उलथवण्यासाठी भाजपनं स्थानिक पक्षांची हातमिळवणी केली आहे.
पंजाब वगळता उ. प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेनं देखील कंबर कसली आहे. उ. प्रदेशात शिवसेना विधानसभेच्या ५० ते १०० जागा लढवणार असल्याचे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत ( Shivsena will contest elections in UP and Goa ) .या निवडणुकीत शिवसेनेनं ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. उत्तर प्रदेशात परिवर्तनाचे वारे वाहतील, असं भाकितही राऊत यांनी वर्तवलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं उ. प्रदेशात समाजवादी पक्षाची युती केली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी सोबत सत्तेत असलेली शिवसेना उ. प्रदेशात समाजवादी पक्षासोबत युती करण्याची सुरवातीला शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, शिवसेना कुणाशीही युती न करता एकहाती भाजपला आव्हान देणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. याआधीही शिवसेनेनं उत्तर प्रदेशात निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, पक्षाला फारसं यश मिळालं नाही. उ. प्रदेशातील निवडणुकीमध्ये जातीय समिकरणं अत्यंत महत्वाची आहेत. भाजप, बसपा, सपा, काँग्रेस या पक्षांची वेगळी पारंपारिक जातीय व्होट बँक आहेत. अशात शिवसेना कुठल्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचं ही निवडणूक सेनेला अवघड जाण्याची चिन्ह आहेत.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या धर्तीवर गोव्यातही काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेत निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात सेना आहे. मात्र, काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. गोव्याच्या राजकारणात तृणमुल, आपच्या एन्ट्रीनं राजकीय समिकरणांना वेगळं वळण लागलं आहे. भाजपविरोधात सक्षम पर्याय उभा करण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना इतर पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. गोव्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत ४० पैकी सर्वाधिक १५ जागा जिंकुनही काँग्रेस सत्ता स्थापन करु शकली नव्हती. भाजपनं मगोप आणि इतर पक्षांच्या सोबतीनं गोव्याची सत्ता काबीज केली. सत्ता गमावल्याच्या विव्हळत्या जखमेवर यंदा एकहाती लढून विजयाचं मलम लावण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेतात हे महत्वाचं असणार आहे.