
अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयवादावरुन सध्या राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. प्रमुख सत्ताधारी पक्ष असणारा शिवसेना आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपा आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपाने मुंबईमधील सोमय्या मैदानावर आयोजित केलेल्या बुस्टर सभेमध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर आंदोलनामधील शिवसेनेच्या सहभागासंदर्भात प्रश्न उपस्थित करत जोरदार टीका केली होती.
आपण ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी पाडली तेव्हा तिथे उपस्थित होतो पण शिवसेनेचा तेथे एकही नेता किंवा शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता असा दावा फडणवीस यांनी जाहीर सभेतून केलाय. या दाव्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना उत्तर दिलेलं असतानाच सध्या शिवसेनेच्या एका आमदाराची पोस्ट चांगलीच चर्चेत असल्याचं दिसत आहे.
औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांचा काही वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. “लाठीचार्ज झाला की पळणारे… म्हणे बाबरी पाडायला गेला होता,” अशा कॅप्शनहीत दानवे यांनी एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस हे पळताना दिसत आहेत.