शिवनारायण चंद्रपॉलच्या मुलाने झिम्बाब्वेविरुद्ध ठोकलं द्विशतक

WhatsApp Group

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज तेजनारायण चंद्रपॉलने कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच वडिलांनंतर त्याच्या मुलानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा मोठा विक्रम केला आहे. तेजनारायण चंद्रपॉल हा वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा आहे. तेज नारायणने हा पराक्रम झिम्बाब्वेविरुद्ध बुलावायो येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात केला आहे.

या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिज संघाने 7 बाद 443 धावांवर पहिला डाव घोषित केला. वेस्ट इंडिजसाठी पहिल्या डावात तेजनारिनने 467 चेंडूंचा सामना करत 207 धावा केल्या. यादरम्यान त्याने 16 चौकार आणि 3 षटकारही मारले. यासोबतच त्याने वडील शिवनारायण चंद्रपॉल यांचा कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही मोडीत काढला. शिवनारायण चंद्रपॉलने वेस्ट इंडिजकडून खेळताना कसोटी सामन्यात 203 धावांची खेळी केली होती. दुसरीकडे, तेजनारायणने 207 धावा करून वडिलांना सोडले आहे.

तेजनारायण याच्याशिवाय वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रॅथवेटनेही या सामन्यात उत्कृष्ट शतक झळकावले. कार्लोसने संघासाठी 312 चेंडूत 182 धावांची खेळी केली, ज्यात त्याने एकूण 18 चौकारही मारले. यादरम्यान त्याने तेजनारायणसोबत पहिल्या विकेटसाठी 336 धावांची विक्रमी भागीदारीही केली. तेजनारायणने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर तो आपल्या संघासाठी तिसरी कसोटी खेळत आहे ज्यात त्याने 367 धावा केल्या आहेत.

शिवनारायण चंद्रपॉल हा वेस्ट इंडिजच्या महान फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आपल्या संघासाठी 164 कसोटी, 268 एकदिवसीय आणि 22 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 51.37 च्या सरासरीने 11867 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 30 शतके आणि 66 अर्धशतके आहेत. त्याच वेळी, एकदिवसीय सामन्यांमध्ये, त्याने वेस्ट इंडिजसाठी 41.60 च्या सरासरीने 8778 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये शिवनारायणने 11 शतकांसह 59 अर्धशतकं ठोकल्या आहेत, तर टी-20 मध्ये त्याच्या नावावर 343 धावा आहेत.