
मुंबई – शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इनमध्ये मुक्कामी आहेत. याच ठिकाणी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. विधानपरिषद निवडणूक आणि वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुख्यमंत्री ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीमधील पराभव आणि उद्या होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय कानमंत्र देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
५६ वर्षे जनसेवेची..
प्रखर हिंदुत्वाच्या तेजाने
तळपत्या शिवसेनेची…पक्षनिष्ठा आणि आपुलकीने पक्षाला भक्कम करणाऱ्या तमाम निष्ठावंत शिवसैनिकांना ५६ व्या शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!#ShivsenaAT56 pic.twitter.com/tlhMFJkbby
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) June 19, 2022
येत्या २० जून रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी शिवसेनेने त्यांचे सर्व आमदार पवई येथील वेस्टिन हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवले आहेत. याच हॉटेलमधील सभागृहात आज शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार आणि काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील शिवसैनिकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन करणार भाषण ऑनलाइनद्वारे पाहता आणि ऐकता येणार आहे.
गेली अडीच वर्षे राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. पण सत्ताधारी शिवसेनेला विरोध पक्ष भाजपने वेगवेगळ्या मार्गांनी घेरलंय. राज्यसभा निवडणुकीमध्ये दगाफटका झाला आणि उद्या होणारी विधान परिषद निवडणूक तसेच संभाव्य प्रलंबित महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची खरी परिक्षा असणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांचं मनोबल उंचावण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.