
मुंबई – ‘एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेब हे तुम्हाला लढवत आहेत. शिवसेनेचा रक्तपात होईल. यामध्ये शिवसैनिक घायाळ होणार आहेत. 25 वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना (Shivsena) संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्यावर यांचं प्रेम नाहीय तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आम्हाला आनंद आहे. पण शिवसेना वाचवण्यासाठी तुम्ही दोन पावलं मागे घ्या. जर शिवसेना फुटू दिली नाहीत तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल’ असं भावनिक आवाहन भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी एकनाथ शिंदे यांना केलं.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आज विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. ठराव जिंकल्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधासभेमध्ये भाषण केलं. यावेळी भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे भावविक आवाहन केलं आहे. ‘एकनाथ शिंदेजी हे तुम्हाला लढवत आहेत. यात रक्तपात शिवसेनेचा होईल. शिवसैनिक घायाळ होतील. 25 वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे’. असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
भास्कर जाधव यांनी विधानसभेत बोलताना म्हणाले, ‘पानिपतच्या लढाईत जे झालं ते आता महाराष्ट्रात होणार आहे. दिल्लीच्या बादशाहसाठी महाराष्ट्रामध्ये युद्ध सुरु आहे. पहिल्या दिवशी सरकार स्थापन झाल्यापासून प्रत्येक गोष्ट, चाल, कृती सरकार उलथवून टाकण्यासाठी होती. कधी कोणाच्या हातात हनुमान चालिसा दिली, कधी भोंगा दिला, नुपूर शर्मा, कंगना आणलीत. पण सत्ता उलटली नाही’, असं भास्कर जाधव यांनी यावेळी सुनावलं.