
औरंगाबाद : एकनाथ शिंदे गटामध्ये गेलेले 15 ते 16 आमदार मातोश्री आणि शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. न्यायालयामध्ये 16 आमदाराच्या अपात्रतेबाबत निर्णय झाला तर सत्ता निघून जाईल आणि आपल्याजवळ काही राहणार नाही, म्हणून घाबरलेल्या आमदारांनी मातोश्री जवळ करण्याचा निर्णय घेतलाय, येत्या काही दिवसात ते दिसेल असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.
रविवारी पैठणमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी शिवसेनेतील आणखी दोन आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा दावा केला होता. त्यावर चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रहार केला. तुमच्याकडे दोन काय तुमचे 15-16 आमदार आमच्याकडे असतील असं उत्तर त्यांनी दिलं आहे. संदीपान भुमरे हे गावठी मंत्री आहेत त्यामुळे संदीपान भुमरे काहीही बोलत असतात, असं म्हणत त्यांनी संदिपान भुमरेंवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंचे समर्थक 2 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदे गटात सामील होतील’, असा दावा पैठणमध्ये बोलताना संदिपान भुमरे यांनी केला होता. त्यावर खैरेंनी उत्तर दिलं. ‘आमच्याकडचं कुणीही शिंदेगटात जाणार नाही. पण उलट यांचे 15-16 आमदार आम्हाला फोन करत आहेत. शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, असं म्हणतात.
‘मी त्यांना म्हटलं की या मग परत उद्धव साहेबांकडं… त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत’, असं खैंरेंनी म्हटलं आहे. दरम्यान, शिंदे गटाने उठाव केल्यानंतर शिवसेना पक्ष अडचणीत सापडला आहे. त्यातच शिंदे गटातील मंत्री संदिपान भुमरे यांनी आणखी शिवसेनेचे दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे. जर भुमरे यांचा दावा खरा ठरला तर नव्याने फुटणारे शिवसेनेचे दोन आमदार कोणते असतील हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.