भाजप-मनसेची युती होणार?, शिवसेना नव्या मित्राच्या शोधात

WhatsApp Group

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेऊन आक्रमक हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. राज ठाकरे यांच्या मागणीला भाजपनं पाठबळ दिलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना सध्या नव्या मित्राच्या शोधात आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. यानंतर भाजपने अनेकदा शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्व सोडल्याचे भाजप नेते वारंवार म्हणतात. त्यामुळे हिंदुत्ववादी मतं हातून जाण्याची मतं शिवसेनेला आहे.

तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत शिवसेनेची स्पेस व्यापण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे शिवसेनेचा मतदार मनसेकडून वळू शकतो. ही सर्व लक्षात घेऊन शिवसेना स्थानिक स्वराज संस्थांमध्ये नवा मित्र शोधत आहेत.

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा हाती घेतला. भूमिपुत्रांच्या रोजगाराचा मुद्दा हाती घेऊन परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मनसैनिकांनी परप्रांतीयांना मारहाणदेखील केली. त्यामुळे भाजपला मनसेसोबत युती करण्यात अडचणी येत होत्या.

मात्र आता राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. त्यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात थेट भूमिका घेतली आहे. त्याचे परिणाम उत्तर प्रदेशमध्येही पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे लवकरच अयोध्येचा दौराही करणार आहेत. त्यामुळे भाजप-मनसे युती होण्याची शक्यता वाढली आहे.