अहमदनगर – कोविड (COVID) प्रकोपामुळे सार्वजनिक वावरावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध होते. राज्यातील मंदिरांची कवाडेही गेल्या दीड वर्षांपासून बंद होती. राज्य सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. तब्बल दीड वर्षानंतर ओम साईरामच्या जयजयकाराने शिर्डी ( Shirdi ) येथील साईंचा दरबार (Sai Baba ) दुमदुमून गेला. मंदिर उघडल्यानंतर आज देशभरातील भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली.
‘साई’ दरबार सुनासुना:
भारतासोबतच विदेशी भाविकांची रीघ दर्शनासाठी लागलेली असते. वर्षभरात शिर्डी येथे मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात. मात्र, कोविड प्रकोपामुळे प्रत्यक्ष दर्शन रांग गेल्या दीड वर्षापासून बंद होती.
‘या’ भक्तांना नो-एन्ट्री:
साई संस्थान प्रशासनाने भक्तांच्या दर्शनासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली आहे. तासाला एक हजार याप्रमाणे दिवसाला पंधरा हजार भक्तांना दर्शन घेता येणार आहे. संस्थानच्या मंदिर परिसरातील केंद्रावरुन तसेच संस्थानच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पास काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. दहा वर्षांखालील बालके, गर्भवती महिला तसेच वृद्धांना मात्र दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. फुले, हार तसेच पूजेचे साहित्य घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सबुरी अन् खबरदारी:
सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे. कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन संस्थान प्रशासनाने दर्शनरांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनिंगची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
शिर्डीवरुन टेक-ऑफ:
तब्बल 18 महिन्यानंतर शिर्डी विमान तळावरुन विमानांचे उड्डाण होणार आहे. विमानतळ प्राधिकरणाने उड्डाणांची घोषणा केली आहे. येत्या 10 सप्टेंबरला शिर्डी-हैदराबाद व शिर्डी-चेन्नई अशी दोन उड्डाणे होणार आहेत. परिस्थितीचा अंदाज घेऊन विमानसेवा पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाने दिली आहे.