15 दिवसांत शिंदे-फडणवीस सरकार पडेल, संजय राऊत यांचा मोठा दावा

WhatsApp Group

उद्धव ठाकरे यांची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. येत्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार पडेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या सरकारचे ‘डेथ वॉरंट’ जारी करण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
दरम्यान, याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रत्येकजण आपापली गणिते मांडत आहे. पण आम्ही निकालाची वाट पाहत आहोत. मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांची सध्याची राजवट येत्या 15 ते 20 दिवसांत कोसळेल, असे राऊत म्हणाले. मी एकदा म्हटले होते की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. मात्र न्यायालयाचा निर्णय उशिराने येत आहे. मात्र हे सरकार टिकणार नाही, या सरकारचे ‘डेथ वॉरंट’ जारी करण्यात आले आहे. आता कोण आणि कधी सही करणार हे ठरले आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबत चर्चा सुरू असतानाच राऊत यांचे हे वक्तव्य आले आहे. मात्र, आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे त्यांनी आपल्या बाजूने स्पष्ट केले आहे.