शिखर धवनकडून कर्णधारपद काढून घेतल्याने चाहते संतापले, म्हणाले ‘सीनियर खेळाडूंचा आदर करा’

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) गुरुवारी रात्री सलामीवीर केएल राहुलची फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्याची माहिती दिली. यासोबतच बोर्डाने त्याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी कर्णधारपदीही नियुक्ती केली आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली होती आणि त्यानंतर कर्णधारपदाची जबाबदारी सलामीवीर शिखर धवनकडे सोपवण्यात आली होती. मात्र राहुल तंदुरुस्त होताच धवनकडून कर्णधारपद काढून त्याला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले.

केएल राहुलचे टीम इंडियात पुनरागमन झाल्याने चाहते खूश आहेत, पण बीसीसीआयने धवनकडून कर्णधारपद हिरावून घेतल्याने ते नाराज झाले आहेत. बोर्डाच्या या निर्णयानंतर चाहते ट्विटरवर संताप व्यक्त करत आहेत. धवनसारख्या वरिष्ठ खेळाडूचा बीसीसीआयने सन्मान केला पाहिजे, असं चाहते म्हणत आहेत. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत धवनने अलीकडेच वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघाची धुरा सांभाळली होती.

आयपीएल 2022 नंतर केएल राहुल संघाबाहेर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या T20 मालिकेसाठी त्याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, परंतु दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर पडला होता. यानंतर हर्नियाच्या शस्त्रक्रियेमुळे केएल राहुल इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकला नाही. जेव्हा तो विंडीज दौऱ्यावर परतण्याच्या तयारीत होता, तेव्हा त्याला कोविड-19 चा फटका बसला. केएल राहुलची पहिल्यांदा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती, परंतु फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला आता कर्णधार बनवण्यात आले आहे.

3 एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ – केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, फेमस कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.