केपटाऊन: आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने (MI) घेतलेला एक निर्णय किती योग्य होता, याची प्रचिती सध्या दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर येत आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शेरफेन रदरफोर्ड याने साऊथ आफ्रिका टी-२० लीगमध्ये (SA20) धावांचे वादळ निर्माण केले आहे. मुंबई इंडियन्सने नुकतेच रदरफोर्डला गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून आपल्या संघात सामील केले असून, त्याने आपल्या बॅटिंगने विरोधकांच्या मनात आत्तापासूनच धडकी भरवली आहे.
३१३ च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांची पळताभुई
प्रिटोरिया कॅपिटल्सकडून खेळताना रदरफोर्डने एमआय केपटाऊनविरुद्धच्या सामन्यात अक्षरशः आगीच्या गोळ्यांप्रमाणे फटकेबाजी केली. त्याने अवघ्या १५ चेंडूंमध्ये नाबाद ४७ धावांची खेळी साकारली. या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे रदरफोर्डने एकही चौकार न मारता तब्बल ६ गगनभेदी षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट ३१३.३३ इतका अवाढव्य होता. त्याच्या या खेळीमुळे प्रिटोरियाने धावफलकावर २२० धावांचा डोंगर उभा केला, ज्याचा पाठलाग करताना विरोधी संघाची दमछाक झाली.
47* off 15 💣
4 for 24 🎯Sherfane Rutherford vs MI Cape Town 🔥 pic.twitter.com/LfezY4FYrJ
— Cricbuzz (@cricbuzz) January 1, 2026
एकाच षटकात ४ सलग षटकार!
रदरफोर्डची ही फटकेबाजी पाहून चाहत्यांना युवराज सिंगच्या सहा षटकारांची आठवण झाली. त्याने ड्वेन प्रिटोरियसच्या एकाच षटकात सलग ४ षटकार खेचले. दुसऱ्या टोकाकडून त्याला डेवाल्ड ब्रेविसची (बेबी एबी) उत्तम साथ मिळाली. ब्रेविसनेही अवघ्या १३ चेंडूत ३६ धावा कुटल्या. या दोघांच्या तुफानी फलंदाजीमुळे शेवटच्या काही षटकांत धावांचा पाऊस पडला. रदरफोर्डने केवळ बॅटनेच नाही, तर गोलंदाजीमध्येही २४ धावांत ४ बळी घेत संघाला ८५ धावांनी मोठा विजय मिळवून दिला.
मुंबई इंडियन्सच्या गोटात आनंदाचे वातावरण
मुंबई इंडियन्सचा संघ नेहमीच अशा खेळाडूंवर दांव लावतो जे मॅच विनर ठरतात. रदरफोर्डला २.६ कोटी रुपयांमध्ये ट्रेड करून मुंबईने आपल्या मध्यक्रमाला अधिक मजबूत केले आहे. कायरन पोलार्डनंतर मुंबईला एका अशा फिनिशरची गरज होती, जी गरज रदरफोर्ड पूर्ण करताना दिसत आहे. आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच रदरफोर्डने आपला ‘फॉर्म’ दाखवून दिल्याने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
