नवी दिल्ली: आयपीएल २०२६ च्या हंगामातून बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला बाहेर काढण्याच्या निर्णयावरून आता राजकीय युद्ध पेटले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) मुस्तफिजुरला रिलीज करण्याचे आदेश दिल्यानंतर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही नक्की कोणाला शिक्षा देत आहोत? एखाद्या देशाला, व्यक्तीला की त्याच्या धर्माला?” असा रोकठोक सवाल थरूर यांनी उपस्थित केला असून केंद्र सरकार आणि बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.
डिप्लोमेसीवर सोशल मीडिया हावी; थरूर यांचा घणाघात
शशी थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक लांबलचक पोस्ट शेअर करत सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, “एकानंतर एक शेजारील देशांसोबतचे संबंध हाताळताना सरकार सोशल मीडिया मोहिमांना आपल्या मुत्सद्देगिरीवर (Diplomacy) हावी होऊ देत आहे. यामुळे भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ नष्ट होत आहे.” परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ढाका दौऱ्यावर जाऊ शकतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या नेत्यांना भेटू शकतात, मग केवळ एका क्रिकेटपटूला भारतीय लीगमध्ये खेळण्यापासून रोखणे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
“हा खेळाचा विनाकारण राजकीय बळी”
थरूर यांनी बीसीसीआयच्या या निर्णयाला चुकीचे पाऊल म्हटले आहे. त्यांच्या मते, मुस्तफिजुर रहमानविरुद्ध घेतलेला हा निर्णय अतार्किक आहे. “खेळाचे असे विनाकारण राजकीयीकरण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?” असा प्रश्न त्यांनी विचारला. बांगलादेशातील हिंदूंच्या विरोधात होणाऱ्या हिंसेमुळे भारतात संताप आहे, मात्र त्या रागाची शिक्षा एका खेळाडूला देणे थरूर यांना पटलेले नाही. मुस्तफिजुरला ९.२० कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर केकेआरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, ज्याचा परिणाम अखेर त्याच्या हकालपट्टीत झाला.
बीसीसीआय आणि केकेआरची भूमिका
दुसरीकडे, बीसीसीआयने आपल्या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय घेणे आवश्यक होते. केकेआरनेही स्पष्ट केले आहे की त्यांनी केवळ बोर्डाच्या सूचनांचे पालन केले आहे. मुस्तफिजुरच्या जागी केकेआरला नवीन खेळाडू निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, शशी थरूर यांच्या या हस्तक्षेपामुळे क्रिकेट आणि राजकारण यातील सीमा पुन्हा एकदा धूसर झाल्या असून, यावर आता सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे.
