Navratri 2024 : नवरात्री वर्षभरात 4 वेळा साजरी केली जाते. 2 गुप्त नवरात्रीच्या रूपात आणि एक चैत्र नवरात्री चैत्र महिन्यात साजरी केली जाते आणि दुसरी नवरात्र अश्विन महिन्यात येते. अश्विन महिन्यात साजरी होणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून याची सुरुवात होते. या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात गुरुवार 03 ऑक्टोबर 2024 पासून होत आहे जी शनिवार 12 ऑक्टोबर 2024 रोजी संपेल. नवरात्रीच्या काळात भक्त मातेच्या नऊ रूपांची पूजा करतात आणि अनेक लोक या काळात नऊ दिवस उपवासही करतात. दुर्गा मातेच्या नऊ रूपांची उपासना केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. नवरात्र हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे, नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. अशा परिस्थितीत नवरात्रीमध्ये देवीची पूजा का केली जाते? हे जाणून घेऊया.
नवरात्रीशी संबंधित पहिली कथा
देवी दुर्गा आणि महिषासुराच्या कथेचा उल्लेख हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. या कथेतून सत्ता आणि अधर्मावर धर्माच्या विजयाचा संदेश मिळतो. या आख्यायिकेनुसार, महिषासुर नावाच्या शक्तिशाली राक्षसाने आपल्या शक्तीचा चुकीचा वापर करत स्वर्ग आणि पृथ्वीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. महिषासुराने तपश्चर्या करत भगवान ब्रह्मदेवाकडून आशीर्वाद प्राप्त केला होता की, कोणीही देव, राक्षस किंवा मानव आपल्याला मारू शकत नाही. त्यानंतर देवतांनी ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांना महिषासुराच्या अत्याचारांपासून मुक्तीसाठी प्रार्थना केली. यानंतर तिन्ही देवतांनी आपापल्या शक्ती एकत्र करून देवी दुर्गा प्रकट केली. यासोबतच त्यांनी आपली सर्वोत्तम शस्त्रे माता दुर्गाला दिली.
यानंतर महिषासुर आणि देवी दुर्गा यांच्यात युद्ध झाले. महिषासुराने अनेक रूपे बदलली, परंतु देवी दुर्गेने महिषासुराच्या सर्व रूपांचा पराभव केला. युद्धाच्या शेवटी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला. असं मानलं जातं की देवी दुर्गेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला. विजयाच्या स्मरणार्थ, देवतांनी माता दुर्गेची स्तुती केली आणि तिचे नाव महिषासुरमर्दिनी ठेवले. आजही नवरात्रीच्या नऊ दिवसांत मातृशक्तीची पूजा केली जाते.
नवरात्रीशी संबंधित दुसरी कथा
रामायणात सांगितल्यानुसार, भगवान रामाने लंकेत रावणाशी युद्ध करण्यापूर्वी नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा केली होती. भगवान रामाच्या त्यागावर माता दुर्गा प्रसन्न झाली आणि त्यांनी त्यांना युद्धात विजय मिळवून दिला. दहाव्या दिवशी रामाने युद्धात रावणाचा पराभव केला. त्यामुळे नवरात्रीनंतरचा दहावा दिवस विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. असे मानले जाते की रामजींनी नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा केली आणि तेव्हापासून नवरात्रोत्सव सुरू झाला.